Wardha Crime : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील (Krushi Utpanna Bajar Samiti) भाजी खरेदी करण्यास गेलेलेल्या दोन व्यक्तींच्या खिशातील मोबाईल फोन चोरणाऱ्या चोरट्यांना वर्धा गुन्हे शोध पथकाने (Wardha Police)अखेर अटक केली असून गुन्हा उघडकीस आणला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती भाजी मार्केट येथे प्रकाश सोनबाजी देवघरे आणि राजेश शामलालजी भारव्दाज दोन्ही रा. गणेश नगर वर्धा हे 24 जुलै रोजी सकाळी भाजी घेण्यासाठी गेले होते, रविवार बाजाराचा दिवस असल्याने मार्केटमध्ये गर्दी होती. प्रकाश देवघरे आणि राजेश भारद्वाज यांचा मोबाईल भाजी घेत असता चोरी गेल्याने त्यांनी लगेच पोलिस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिली. पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली होती.
झारखंड राज्यातील तिघांना वर्धा बसस्टॉपवरून अटक
पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार प्राप्त होताच गुन्हे शोध पथकाचे संजय पंचभाई यांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीवरून आरोपी मोहम्मद अबुल मुर्शीद अन्सारी, शेख शोएब शेख उम्बर, शेख अफ्रिदी शेख अस्लम (झारखंडचे रहिवाशी) यांना वर्धा शहर बस स्टॉपवरून ताब्यात घेतलं.
गेल्या काही महिन्यांपासून वर्धा जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ
गेल्या काही महिन्यांपासून वर्धा जिल्ह्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना बघायला मिळतेय. शहरासह जिल्हाभरात मारहाण, चोरी, हत्या, लूटमार यासारख्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे पोलिसांनीही कडक कारवाई करण्याची गरज असल्याचं नागरिकांचं मत आहे. तसेच पोलिस दलाकडून देखील नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, गर्दीच्या ठिकाणी जाताना सतर्क राहावे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वर देऊन महिलांचे मंगळसूत्र चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच मारहाणीच्या घटना सातत्याने घडत आहेत. बाजारात खरेदीसाठी गेलेल्या महिलांच्या पर्स पळविणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यावर पोलिसांकडून उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.