Wardha : वर्धा (Wardha) शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्ध्याच्या बोरगावमधील गणेश नगर येथे तीन वर्षाचा बालक नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. गणेशनगर येथे राहत असलेल्या पंकज मोहदुरे यांच्या घराजवळ मोठी नाली आहे. सायंकाळी झोपेतून उठून बाहेर आलेला तीन वर्षीय बालक डुग्गु पंकज मोहदुरे अचानक घरासमोरील मोठ्या नालीत पडला. त्यावेळी त्याच्याजवळ कुणीही नसल्याने तो वाहत गेला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या मोठ्या नालीचे रुपांतर मोठ्या नाल्यात होत असल्याने हा बालक तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत वाहत गेला. मुलगा अचानक गायब झाल्याने त्याचा शोध सुरू झालाय. पण हा वाहून गेलेला बालक गावाबाहेर चितोडा नाल्यात सापडला आहे. नालीच्या पाण्यात तीन वर्षांचा चिमुकला वाहून गेला आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे. डुगु पंकज मोहदुरे असं या चिमुकल्याचं नाव असून, या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात ओढ्याला आलेल्या पुरात दोन महिला गेल्या वाहून
गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात देखील मोठा पाऊस झाला आहे. या पावसाने जिल्हाभरात थैमान घातले आहे, सर्वदूर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. ओढ्याला आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे.
वसमत तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस
वसमत तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. गुंडा या गावाच्या शिवारात सुद्धा अशाच पद्धतीने पावसाने थैमान घातल्याने गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आलेला आहे. या पुरामध्ये दोन महिला वाहून गेल्या आहेत. कामानिमित्त शेतातून या दोन महिला घरी परतत असताना ओढ्याला पूर आला आहे. या पुरातूनही धोकादायक पद्धतीने पुराच्या पाण्यातून प्रवास करत असताना या महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. सखुबाई भालेराव आणि गयाबाई सारोळे असं वाहून गेलेल्या दोन महिलांचे नावे आहेत. गावकऱ्यांच्या वतीने शोध कार्य सुरू आहे. तर घटनास्थळी लवकरच वसमतचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार पोहोचत आहेत.