Sangli News : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, तासगाव, पलूस, आष्टा या पाच नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झालं आहे. शिराळा नगरपंचायतीसाठीही आरक्षण प्रक्रिया पार पडली. चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चिती करण्यात आली. प्रत्येक प्रभागांत दोन सदस्य असतील. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपालिका व नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्या प्रभागांची आरक्षण प्रक्रिया राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले होते.
ओबीसी आरक्षण नसल्याने सर्वच प्रभागांत खुल्या प्रवर्गांची संख्या वाढली आहे, त्यामुळे निवडणुकीचे बाशिंग बांधलेल्या इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. इस्लामपुरात १५ प्रभागांत ३० नगरसेवक असतील. तासगावमध्ये २४ पैकी ११ जागा खुल्या आहेत. विट्यात १३ प्रभागांत २६ नगरसेवक असतील. पलूसमध्ये प्रभागांची संख्या दोनने वाढून १० झाली आहे, त्यामुळे चार नगरसेवक वाढून २० झाले आहेत. आष्ट्यातही प्रभागांची संख्या बारा, तर नगरसेवकांची संख्या २४ वर गेली आहे.
जनतेतून थेट नगराध्यक्ष पद्धत बंद झाल्याने या पदावर डोळा ठेवून नेत्यांना उमेदवारी वाटप करावे लागणार आहे. मात्र, नगराध्यक्षपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याने गोची झाली आहे. प्रभागांतील आरक्षणाची निश्चिती जाहीर झाल्याने सर्वच इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. खुल्या जागा वाढल्याने इच्छुकांची गर्दी वाढली आहे, त्यामुळे तिकीट वाटपामध्ये नेत्यांची कसोटी लागणार आहे. बंडाळीलादेखील उधाण येण्याची चिन्हे आहेत.आरक्षण सोडतीबाबत सूचना व हरकती १५ ते २१ जूनअखेर मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल करता येणार आहेत. प्रभाग कार्यालयातही स्वीकारल्या जातील. सुनावणीसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त असेल.
पलूस नगरपरिषद
पलूस नगरपरिषदेच्या 10 प्रभागातील नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी आरक्षित वर्गाच्या लोकसंख्येवरून काढलेल्या सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसुचित जाती महिला, तर प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनुसुचित जातीसाठी राखीव झाला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये सर्वसाधारण, तर प्रभाग क्रमांक तीन अ सर्वसाधारण महिला साठी राखीव झाला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 1, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे प्रत्येकी सर्वसाधारण महिला, व सर्वसाधारण वर्गाकरीता आरक्षित करण्यात आले आहे
विटा नगरपालिका
विटा नगरपालिकेच्या आरक्षण सोडतीत प्रभाग पाच, नऊ, अकरा आणि बारा हे अनुसुचित जातीसाठी राखीव झाले. तर उर्वरीत सर्व प्रभागात प्रत्येकी एक महिला आणि एक सर्वसाधारण खुला अशा प्रकारे आरक्षण पडले आहेत.
आष्टा नगरपरिषद
आष्टा नगरपरिषदेत आरक्षण सोडतीत एकूण 12 प्रभागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यात प्रामुख्याने प्रभाग 4, 12, 3 व 1 हे अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. एकूण 24 जागांसाठी लढत होणार आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी सोडत काढल्यानंतर प्रभाग 12 व 4 मध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षण पडले आहे. 1 व 3 मध्ये अनुसूचित जाती साठी सामान्य आरक्षण पडले आहे. तसेच प्रत्येक प्रभागातील एक जागा महिलांसाठी राखीव तर इतर सर्व जागा इतरांसाठी राहतील.
तासगाव नगरपालिका
तासगाव नगरपालिकेच्या आरक्षण सोडतीत, ओबीसी आरक्षण नसल्याने 24 पैकी 11 जागांवर सर्वसाधारण, तर 11 जागांवर सर्वसाधरण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे तासगाव नगरपालिकेत यंदा अपवाद वगळता प्रत्येक प्रभागात खुले आरक्षण झाल्यामुळे सर्वच इच्छुकांची चांगली सोय झाली आहे. ओबीसी आरक्षण नसल्यामुळे प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मधील प्रत्येकी एका जागेचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी आरक्षण खुले राहिले आहे. 11 क्रमांकाचा प्रभाग सोडल्यास उर्वरीत 11 प्रभागात प्रत्येकी एक जागा सर्वसाधारणसाठी जाहीर झाली आहे. बाकी सर्वच आजी, माजी, प्रस्थापित कारभाऱ्यांसाठी मैदान खुले राहिले आहे.
इस्लामपूर नगरपरिषद
इस्लामपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4 व 6 अनुसुचित जाती महिला राखीव झाले असून प्रभाग क्रमांक 5 व 15 हे अनुसुचित जाती सर्वसाधारण झाले आहेत. त्यामुळे 15 प्रभागांपैकी 11 प्रभागामध्ये सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे आरक्षण झाले आहे. प्रभाग क्रमांक 4 व 6 अनुसुचित जाती महिला झाले, तर 5 व 15 हे प्रभाग अनुसुचित जाती सर्वसाधारण झाले. त्यामुळे आरक्षित असणार्या दुसर्या जागेसाठी 4 व 6 प्रभागात सर्वसाधारण तर 5 व 15 प्रभागात सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या