लातूर :  वक्फ न्याय प्राधीकरणाकडून लातूर जिल्ह्यातील आणखी 175 एकर जमिनीवर दावा करण्यात आला आहे. त्यासंदर्भाने शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील तळेगाव नंतर आता औसा तालुक्यातील बुधोडा येथील 25 शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाची नोटीस आली आहे. त्यानुसार, 175 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाकडून दावा करण्यात आला आहे. याबाबत, शेतकऱ्यांनी (Farmers) तात्काळ कोर्टात धाव घेतली. मात्र, या घटनेने येथील शेतकरी वर्गात मोठी धांदल उडाली आहे. यापूर्वी तळेगाव येथील 300 एकर जमिनीवर दावा करत शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 


लातूरच्या बुधोडामध्ये शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस आली आहे. जिल्ह्यातील तळेगाव नंतर लातूर जिल्ह्यातील दुसरा धक्कादायक प्रकार समोर आला. शेतकऱ्यांच्या जवळपास 175 एकर जमिनीवर दावा करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. औसा तालुक्याच्या बुधोडा गावातील 25 शेतकरी सध्या हवालदिल झाले आहेत. काही दिवसांपर्वी या गावातील शेतकऱ्यांना कोर्टाची नोटीस आली. या पंचवीस शेतकऱ्यांची मिळून 175 एकर जमीन या भागात मागील अनेक पिढ्यापासून आहे. या जमिनीवर आता दावा करण्यात आला आहे, तो दावा वक्फ बोर्डकडून करण्यात आला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.


तळेगाव येथील जमिनीवर दावा, काय म्हणाले वक्फ बोर्ड


लातूर जिल्ह्यातील तळेगाव हे 150 उंबऱ्याचे गाव आहे. या गावातील सर्वजण शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, या गावातील 75 टक्के जमिनीवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. गावातील 103 शेतकऱ्यांचा 300 एकर जमिनीचा यात समावेश आहे. यामुळं आता अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये भीतीचं वातावरण परसलं आहे. दरम्यान, तळेगावच्या शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसशी वक्फ बोर्डाचा कुठलाही संबंध नसल्याचे आता वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे. एकाच वेळी 103 शेतकऱ्यांना नोटीस आल्याने अनेकांनी वकिला मार्फत आपले म्हणणे सादर केले आहे. यावर आता 20 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, या नोटीसशी वक्फ बोर्डाचा कुठलाही संबंध नसल्याचे आता वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे. राज्यातील वक्फ बोर्डचे अध्यक्ष समीर काजी यांच्या माहितीनुसार तळेगाव येथील शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीस या एका व्यक्तीने कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने काढल्या आहेत. त्या नोटीस वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत. अशी स्पष्टोक्ती ही महाराष्ट्र वक्फ बोर्डाने आता दिली आहे.


हेही वाचा


साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी