आपल्याला महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा करायचा आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना लाडकी बहिण आठवली, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीवर तोफ डागली. चुकीच्या हातामध्ये सत्ता असल्याची टीका पवार यांनी केली. 



आज पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे


शरद पवार म्हणाले की, मागे आलो होते तेव्हा काहीतरी चुकतंय का? असे कार्यकर्ते यांच्याकडून बघून वाटत होतं. मी अनेक सभा घेतल्या, मला डोळ्यात बघून कळतं. आज तुमचे डोळे प्रफुल्लित आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेला आलो होतो तेव्हा डोळ्यात घाबरट होती. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे. महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी चळवळ झाली त्यामध्ये फलटण अग्रेसर होते. हरिभाऊ निंबाळकर आमदार झाले. कारण महाराष्ट्राला मराठी भाषिकांचे राज्य हवं होतं.  यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पद मिळावं, याचा काँग्रेसचा ठराव फलटणमधील मनमोहन पॅलेस येथे झाला. त्यामुळे महाराष्ट्र उभा करण्यामध्ये फलटणकरांचे योगदान मोठं हे कुणी विसरू शकत नाही. 


फडणवीस यांच्या हातात सत्ता होती तेव्हा बहीण दिसली नाही


स्वतःच्या बहिणीबद्दल आस्था असतेच. मागे कधी बहीण आठवली नाही. पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता होती तेव्हा बहीण दिसली नाही. लोकसभेला जेव्हा पराभव झाला तेव्हा बहिण आठवली. बारामतीकर लय हुशार आहेत. तिथे एक बहीण उभी होती. प्रचाराला गेलो की लोक गप्प बसायचे. इतक्या वर्षाचे संबंध होते, जीवाभावाचे होते. पण बारामतीकरांना मताच्या स्वरूपात बहिणीला पाठिंबा दिला.


तुम्ही काही काळजी करू नका आपल्याला लांब जायचंय


ते पुढे म्हणाले की, मला साठ वर्षात एक दिवस पण तुम्ही सुट्टी दिली नाही. मला चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राचा चेहरा बदलायची माझी नैतिक जबाबदारी आहे. आज चुकीच्या हातात सत्ता आहे. आज महाराष्ट्र कुठे ना कुठे अत्याचार होत आहे. शाळेत लहान मुलीवर अत्याचार झाला, काल एका माजी मंत्र्यांची हत्या झाली. सामान्य माणूस आणि आया बहिणींना सुरक्षिततेने जगता येत नाही. ज्यांचे हात बरबटले आहेत त्यांच्या हातात सत्ता आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन झाला आठ महिन्यात पुतळा खाली आला. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्याचा अनावरण केलं साठ वर्ष होऊन गेली तरी त्याला काही झालं नाही. तुम्ही काही काळजी करू नका आपल्याला लांब जायचं आहे. या तुतारीने संबंध देशात आवाज आल्याशिवाय राहणार नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या