नांदेड: मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केलं, त्यालाच ते मिळालं की नाही, याची माहिती आतापर्यंत समजत नव्हती. मात्र आता यापुढे तुम्ही केलेलं मतदान, त्याच उमेदवाराला मिळालं आहे की नाही, हे समजणार आहे.


राज्यात पहिल्यांदाच व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात येणार आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत याचा उपयोग करण्यात येईल. यासाठी पहिल्यांदाच ईव्हीएममशीन सोबत निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट मशिनचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हीव्हीपॅट मशिन काम कसं करतं?

व्हीव्हीपॅट अर्थात व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. मतदार जेव्हा एखाद्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी त्याच्या चिन्हापुढील बटण दाबतो, त्यावेळी व्हीव्हीपॅट मशिनवरील स्क्रीनवर ज्या उमेदवारच्या नावापुढील बटण दाबले गेले, त्याचे नाव आणि चिन्हाची प्रिंट निघते. मतदाराला स्क्रीनवर काही सेकंद ही प्रिंट स्पष्ट दिसते आणि मग ही प्रिंट व्हीव्हीपॅट मशिनमधील डब्यात जाऊन पडते.

अशा पद्धतीने मतदारला मतदान कुणाला केले आणि कुणाला झाले याचा पुरावा बघायला मिळणार आहे.