यवतमाळ : कार-दुचाकी-ट्रकचा तिहेरी अपघात, सहा जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 27 May 2018 11:08 PM (IST)
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब-राळेगाव मार्गावर कात्री गावाजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये मोहन मेश्राम, गोपाळ जुनघरे, विनोद वड्डे ,सोनाली पाल, राजेंद्र पाल आणि श्रुती खडसे या सहा जणांचा समावेश आहे.
यवतमाळ : दुचाकी, कार आणि ट्रक यांच्या तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब-राळेगाव मार्गावर कात्री गावाजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये मोहन मेश्राम, गोपाळ जुनघरे, विनोद वड्डे ,सोनाली पाल, राजेंद्र पाल आणि श्रुती खडसे या सहा जणांचा समावेश आहे. सोनाली पाल, राजेंद्र पाल हे दोघे पती-पत्नी आहेत. पाल दाम्पत्य, त्यांचा सात वर्षांचा मुलगा आणि त्यांची मेहुणी असे चौघे दुचाकीने वरोराकडे जात होते. तर कारमधील मोहन मेश्राम, गोपाळ जुनघरे, विनोद वड्डे हे तिघे राळेगावकडे जात होते. कात्री गावाजवळ दुचाकी, कार आणि ट्रकमध्ये विचित्र अपघात झाला. जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठवण्यात आलं. हा अपघात सायंकाळी सहाच्या सुमारास कात्री गावाजवळ झाला. पाल दाम्पत्य चंद्रपूर जिल्ह्याच्या सोईट येथील रहिवासी असून ते सर्व दुचाकीने वरोराकडे जात होते.