Vitthal Rukmini Chandan Utti Puja : वैशाख वणव्याची दाहकता चैत्रातच जाणवू लागली आहे. त्यामुळं मंदिर समितीने परंपरेनुसार विठुरायाच्या चंदन उटी पूजेस सुरुवात केली आहे. विठुरायावर केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पूजनासाठी देशभरातील भाविकांकडून मोठी मागणी असते. खास उन्हाळ्यात होणाऱ्या या चंदन उटी पूजा देखील भाविकांच्या खूपच लोकप्रिय असते. यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे.
विठुरायाच्या चंदन उटी पूजेसाठी 21000 तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 9000 हजार रुपयांचे देणगीमूल्य
श्रीविठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून ही चंदन उटी पूजा केली जाते. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रतिवर्षी या पूजा भाविकांना देणगी मुल्य आकारून उपलब्ध करून देण्यात येतात. सदरच्या चंदनउटी पुजा मंदिर समितीमार्फत करण्यात येत आहे. श्री विठुरायाच्या चंदन उटी पूजेसाठी 21000 तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 9000 हजार रुपयांचे देणगीमूल्य मंदिर समिती आकारुन या पूजा देत असतात. आता तीन महिने तीव्र उन्हाळ्याचा काळ असल्याने विठुरायाला या उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी शीतल अशा चंदनाचा लेप संपूर्ण अंगाला लावण्यात येत असतो. हे केलेले चंदनाचे लेपन रात्रभर देवाच्या अंगावर ठेवण्यात येते व पहाटे काकडा आरतीच्या वेळेला हे चंदन काढण्यात येते. त्यामुळे रात्रभर देवाला या चंदनाची शीतलता आणि सुगंध जाणवत राहतो.
चंदन उटी पुजेसाठी खास म्हैसूर येथून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात येते
चंदन उटी पुजेसाठी खास म्हैसूर येथून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात येत असते. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत हा चंदनउटीची पूजा होत असते. विठुरायाच्या पोषाखाच्यावेळी आता रोज ही पूजा होत असून देवाच्या अंगावर अंगी घालण्या ऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात झाली आहे. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील यापद्धतीने चंदन उटी लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या रोजच्या चंदन उटी पूजेसाठी दीड किलो उगाळलेले चंदनाची आवश्यकता असते यात केशर मिसळण्यात येते. विठुराया आणि रुक्मिणी मातेला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकडा आरतीच्यावेळी काढण्यात येते.
महत्वाच्या बातम्या: