कोल्हापूर : प्रशांत कोरटकर हा शिवभक्त होता, त्याच्या हातून गुन्हा घडायच्या आधी शिवजयंतीला त्याने रायगडला जाऊन महाराजांना अभिवादन केल्याचे पुरावे आहेत असा युक्तिवाद कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी केला. या प्रकरणात आता तपास करण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे तो पळून जाईल असा युक्तिवाद विरोधी पक्षाकडून केला जातोय असा आरोपही त्यांनी केला. प्रशांत कोरटकरला सध्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणी आज संपली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करण्याचा, तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप प्रशांत कोरटकरवर आहे. त्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या त्याच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे.
कोरटकर हा शिवभक्त, वकिलांचा युक्तिवाद
प्रशांत कोरटकरचे वकील सौरभ घाग युक्तिवाद करताना म्हणाले की, "आरोपी हा शिवभक्त आहे. गुन्हा घडायच्या आधी शिवजयंती होती. त्यावेळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्याची त्याची पोस्ट आहे. या प्रकरणात तपास करण्यासारखा कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळेच सरकारी वकिलांकडून तो पळून जाईल असं सांगितलं जात आहे. आरोपी घरी आल्यावर असं करू शकतो किंवा तसं करू शकतो असे दावे सरकारी वकिलांकडून केले जात आहेत. मात्र तसं काही होणार नाही."
आरोपीला समाजात तेढ निर्माण करायचा आहे, सरकारी वकिलांचा युक्तिवाद
या प्रकरणी युक्तिवाद करताना सरकारी वकील म्हणाले की, "आरोपी स्वतःला पत्रकार आहे म्हणून सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक माहितीपट तयार केला आहे, असं देखील तो म्हणतो. मग शिवाजी महाराज, संभाजी महाराज यंच्याबद्दल त्याचे विचार घृणास्पद कसे? आरोपीला मराठा आणि ब्राम्हण समाजात तेढ निर्माण करायचा आहे. तक्रारदार हे इतिहास संशोधक आहेत. आरोपीने सुरुवातीला मी कॉल केला नाही असं म्हटलं. मात्र हा तांत्रिक बाबीचा आधार घेण्याचा अपयश ठरलेला हा प्रयत्न आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात कोरटकर याने त्याच्याच मोबाईलवरून फोन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मोबाईल हॅक झाला हा आरोपीचा दावा खोटा ठरतो.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करुन इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरला अटक करण्यात आली. प्रशांत कोरटकरची पोलिस कोठडी रविवारी संपली. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिसीद्वारे 30 एप्रिलला सुनावणी झाली. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकरला कळंबा कारागृहाच्या अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा :