कोल्हापूर : कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरही कारवाई होईल, असं कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ठणकावून सांगितलं.


इतकंच नाही तर गरज पडल्यास  उदयनराजेंवर अटकेची कारवाई करणार असल्याचंही नांगरे पाटील यांनी सांगितलं.

खंडणी आणि जिवे मारण्याच्या आरोपाखाली उदयनराजेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोना अलाईन कंपनीच्या मालकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.

मात्र अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

"या केसमध्ये खूप प्रोफेशन पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन सुरु आहे. त्यातील 9 आरोपी यापूर्वीच अटक केले आहेत. खासदारांचा जामीन फेटाळलेला आहे. तपास अधिकारी पुरावे जमा करुन कारवाई कशा पद्धतीने करायची त्याकडे लक्ष आहे. स्वत: पोलीस अधिक्षकांच्या देखरेखीखाली या खटल्याचा तपास सुरु आहे. कायदा हा सर्वांना सारखाच असतो, गरज पडल्यास कारवाई होईल", असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले.

काय आहे नेमकं प्रकरण?

सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज नावाची कंपनी आहे. या कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे, तर दुसऱ्या संघटनेचं नेतृत्व रामराजे निंबाळकर करतात.

कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते, त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजेंचा आरोप होता. त्यामुळे 18 फेब्रुवारीला त्यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घतलं.

उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना तिथे मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या 

साताऱ्यात उदयनराजेंवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल 

उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता