विरार : केवळ आकसापोटी व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे एका व्यक्तीची दहशतवादी म्हणून बदनामी केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. यामुळे संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला घरबाहेर पडणंही अशक्य झालं आहे.
सईद शेरअली खान आणि सलाम शेख यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला. त्या वादातून सईद खान यांची गाडी जाळण्यात आली. पण पोलिसांनी दखल न घेतल्याने हिंमत वाढलेल्या सलाम शेखने, सईद आणि त्यांच्या मित्राचा फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकून, फोटोतले दोघेही दहशतवादी असल्याची अफवा पसरवली.
"गाइज, ये आदमी किधर भी दिखे तो ये लोग को पकड़ो और पुलीस को दो. क्योंकि ये लोग आतंकवादी है और हर एक जगह जाकर उधर के डिटेल्स ले रहे है. बी अलर्ट," अशा आशयाचा मजकूर व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला आहे.
सईद शेरअली खान विरारच्या गोपचरपाडा इथे पत्नी आणि चार मुलांसह राहतात. पण या पोस्टमुळे सईद यांना घराबाहेर पडणं कठीण झालं असून, या एका मेसेजमुळे लोक आता सईद यांच्याकडे संशयाने पाहत आहेत.
दरम्यान सईद शेरअली खान यांची तक्रार नोंदवण्याची तसदीही पोलिसांनी घेतली नाही. तसंच सलाम शेख यांचीही बाजू समोर आलेली नाही.