मुंबई : उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना इशारा दिला होता की, 48 तासात भारत न सोडल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. त्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने गुपचूप भारत सोडल्याचं 'नवभारत टाईम्स'चं वृत्त आहे. शिवाय, फवाद खान परत भारतात येणार नसल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.


सिनेदिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण'च्या पाचव्या मोसमाच्या पहिल्या भागात अभिनेता फवाद खानला बोलावलं जाणार होतं. मात्र, मनसेच्या इशाऱ्यानंतर या शोमधील पहिल्या भागात आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांना बोलावलं आहे.

करण जोहर म्हणतो….

पाकिस्तानी कलाकारांवरुन बॉलिवूडमध्येही दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या मते, पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणून समस्या सुटणार नाही. मात्र, इथे मुद्दा असा आहे की, करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान हा मुख्य भूमिकेत आहे. फवाद खान हा पाकिस्तानातील लोकप्रिय अभिनेता असून, तो सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावताना दिसतो आहे.

झी ग्रुपकडूनही पाकिस्तानी कलाकारांना सज्जड दम

दरम्यान, याआधी झी ग्रुपचे चेअरमन आणि राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा यांनी उरी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यास पाकिस्तानी कलाकारांना बजावलं. अन्यथा, त्यांनी निघून जावं, असा इशारा चंद्रा यांनी दिला आहे. नवाज शरीफ यांच्या यूएनमधील भाषणानंतर झी समूहाच्या ‘जिंदगी’वरील पाकिस्तानी कलाकरांचे शो बंद करण्याचा इशाराही चंद्रा यांनी दिला आहे.