मुंबई : राज्यातील रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटना सुरूच असून आता विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे अशी भावना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. 


आरोग्यमंत्री राजेश टोपे या घटनेवर बोलताना म्हणाले की, "प्राथमिक स्तरावर पाहता ही दुर्घटना असल्याचं समजतंय. अचानकपणे एसीचा स्फोट झाल्याने केवळ दोन ते तीन मिनीटात सर्वत्र धुर पसरला. त्यामुळे रुग्णांना वाचवायला वेळ कमी मिळाला. दरवाज्याच्या जवळील चार रुग्णांना वाचवण्यात यश आलं आहे."


हा स्फोट का झाला. कसा झाला याची चौकशी करण्यात येईल असं सांगत राजेश टोपे म्हणाले की, "या घटनेवर शासनस्तरावर योग्य ती मदत केली जाईल. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने दवाखान्यांना हातही लावता येत नाहीत. पण फायर ऑडिट, ऑक्सिजन ऑडिटचे आदेश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत."


खासगी मालकीचे असलेल्या या रुग्णालयातील आयसीयूमधील एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याचं सांगण्यात येतंय. त्यावेळी 17 रुग्णांवर उपचार सुरू होते. मृत्यू झालेल्यांपैकी 5 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. 


या रुग्णालयातील अनेक रुग्ण हे ऑक्सिजनवर होते. रात्री साडे तीन वाजता ही आग लागली होती. त्यावेळी रुग्णालयात केवळ दोन नर्स उपस्थित असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना तात्काळ इतरत्र हालवण्यात आलं नाही. सध्या 80 रुग्णांना इतरत्र शिफ्ट करण्यात येत आहे.


विरारची घटाना ही वेदनादायी घटना आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे असं पालकमंत्री दादा भूसे यांनी सांगितलं. 


विरार दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश 
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातीळ अतीदक्षता विभागास आग लागून 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश  दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत


राज्यात भंडारा रुग्णालय, भांडूप कोविड रुग्णालय आणि त्यानंतर नुकतंच नाशिकच्या रुग्णालयात आग लागली होती. नाशिकच्या घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता.