पंढरपूर : मराठी नववर्षात येणारी वारकरी संप्रदायातील पहिली यात्रा म्हणजे चैत्री यात्रा होय. तसे मराठी जणांचा चैत्र महिना हा जत्रा आणि यात्रांचा महिना अशी ओळख असते. या महिन्यात गावोगावी यात्रा आणि जत्रा भारत असतात. या यात्रेची दुसरी ओळख म्हणजे चैत्र यात्रेमधून हरी हरा भेद नाही, हा संदेश वारकरी संप्रदाय जगाला देत असतो. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ही वारी मोठ्या देवाची अर्थात महादेवाची असते. शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या विवाहातील महत्वाचा दिवस चैत्र शुद्ध एकादशीला असतो. त्यामुळे वारकरी या दिवशी विठुराया अर्थात हरी आणि महादेव अर्थात हर या दोघांचे दर्शन करीत असतात. म्हणूनच वारकरी संप्रदायात 
                       

  
                         हरी हरा भेद!
                         नाही नको करू वाद!! 


हे प्रमाण मानले जाते. चैत्र शुद्ध एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. यात काम + दा अशी याची फोड असून काम म्हणजे अंतरीची मनोकामना किंवा इच्छा आणि दा म्हणजे पूर्णत्वाला जाणे, म्हणून या एकादशीला कामदा अर्थात अंतःकरणातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्याचा सामर्थ्य असणारी असे म्हणाले जाते. तसे पहिले तर या इच्छा दोन प्रकारच्या असतात. पहिली प्रापंचिक इच्छा असते, मात्र ही पूर्ण झाली या इच्छा सतत वाढत जाणाऱ्या असतात आणि यातून व्यक्ती समाधान हरवून बसतो. तर दुसरी इच्छा ही पारमार्थिक असते, ही इच्छा पूर्ण झाली की व्यक्ती समाधानी होतो, त्याच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, 
           
                         कृतकृत्य झालो! इच्छा केली ती पावलो!!


म्हणजेच मी जी जी इच्छा केली होती, ती परिपूर्ण झाली आणि परमात्मा मिळाल्याने कृतकृत्य झालो. आता कोणतीही इच्छा उरली नाही अशा शब्दात पारमार्थिक सुखाचे महत्व सांगितले आहे. किंवा दुसऱ्या एका दाखल्यात तुकाराम महाराज म्हणतात, 
                 


                         काम नाही, काम नाही! 
                         झालो पायी रिकामा!! 


यात पहिले काम नाही याचा अर्थ सर्व प्रापंचिक मनोकामना पूर्ण झाल्या आणि दुसरे काम नाही याचा अर्थ सर्व पारमार्थिक मनोकामना पूर्ण झाल्या, म्हणून आता निरपेक्ष झालो. अशा शब्दात तुकाराम महाराजांनी या कामदा एकादशीची महती आपल्या अभंगातून सांगितली आहे. 


या वारीला पळती यात्राही म्हणतात. याचे कारण या यात्रेला येणार भाविक हा महादेवाचा विवाह आणि विठुरायाचे दर्शन यासाठी येत असतो. त्यामुळे या यात्रेच्या वेळी अनेक पवित्र कावड घेऊन भाविक पंढरपूरला येतात. चंद्रभागा स्नान करून देवाचे दर्शन घेतात आणि शिखर शिंगणापूरकडे रवाना होतात. शंकर पार्वतीचा विवाह सोहळ्यासाठी ही मंडळी शिखर शिंगणापूरला जात असतात. या विवाहाला साक्षात विठूरायाची गेले आणि लग्नात पंचपक्वानांचे भोजन केले, अशी आख्यायिका वारकरी संप्रदायात सांगितली जाते. त्यामुळेच चैत्र शुद्ध एकादशीला उपवास असूनही विठुरायाला दुपारी पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात येतो. विशेष म्हणजे देवाला सकाळी उपवासाची खिचडी आणि संध्याकाळीही उपवासाची भगर यांचा नैवेद्य असतो. मात्र दुपारच्या भोजनात हा पुरणपोळीचा महानैवेद्य देण्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही पाळली जाते. 


या यात्रेसाठी मुंबई, कोकण, कोल्हापूर भागांसह  कर्नाटक राज्यातूनही हजारो भाविक येत असतात. यंदा कोरोनाचे महासंकट असल्याने राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पंढरपूर आणि परिसरात देखील शेकडोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण असल्याने या वर्षी एकाही भाविकाला पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जात नाही. विठ्ठल मंदिर देखील गेल्या काही दिवसापासून बंद असले तरी विठुरायाच्या सर्व परंपरा मात्र अखंडितपणे सुरु आहेत. त्यामुळे चैत्र शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशीची महापूजा आणि इतर परंपरा पाळल्या जाणार आहेत. मंदिर बंद असले तरी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा कामदा एकादशीनिमित्त द्राक्षांनी सजविण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथील द्राक्ष बागायतदार संजय टिकोरे यांनी आपल्या बागेतील द्राक्षांची विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी आकर्षक रीतीने सजविली आहे.