मुंबई : राज्यभरातील 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्या मुलांची व्यथा 'एबीपी माझा'ने दाखवल्यानंतर आता राज्यभरातून मदतीचा ओघ या मुलांसाठी सुरू झाला आहे. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन तत्काळ राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर अनाथ मुलांचे प्रश्न आपण सोडवू अशा पद्धतीचं अश्वासन यशोमती ठाकूर यांनी दिल्याची माहिती एबीपी माझाला दिली.
याबाबत बोलताना चाकणकर म्हणाल्या की, एबीपी माझाने अनाथ मुलांच्या व्यथा दाखवणारी जी बातमी केली आहे ती खूपच गंभीर आणि भावस्पर्शी आहे. मी याबाबत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या सोबत बोलले आहे. प्रामुख्याने मी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जी मुलं मुली अनाथाश्रमातून बाहेर पडतात, त्यांच्यासाठी मुलांना सांभाळणाऱ्या ज्या काही मोजक्या संस्था आहेत त्यांची संख्या वाढवावी सरकारने वाढवावी. ज्या खाजगी संस्था आहेत त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी याबाबत चर्चा केली आहे. यासोबतच या मुलांना ते भारतीय आहेत याचा काहीच पुरावा त्यांच्याकडे नाही त्यासाठी किमान त्यांना ओळखपत्र देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे. यासोबतच या मुलांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या मागण्याचं पत्र देखील मी त्यांना पाठवलं आहे. लवकरच महाविकास आघाडी सरकार या मुलांच्या अडचणी दूर करेल.
तर तर्पण फाऊंडेशनचे प्रमुख श्रीकांत भारतीय यांनी अनाथ मुलांसाठी मदतीचा हाथ पुढे करत उद्यापासून राज्यभरातील अनाथ मुलांसाठी हेल्पलाईन सुरू करणार असल्याची घोषणा केली. यासोबतच जून महिन्यापासून जी मुलं अनाथाश्रमातून बाहेर पडतील त्यांची आयक्यू टेस्ट, इक्यू टेस्ट आणि स्किल टेस्ट करणार, आणि त्या मुलाची राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च आणि इमोशन सपोर्ट देणारी एक फॅमिली तर्पण फाऊंडेशन देणार आहे.
याबाबत बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की, आम्ही बच्चू कडू, यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे. उद्यापासून लॉकडाऊन समोर ठेऊन आम्ही एक 24 तास हेल्पलाईन सेवा सुरू करत आहोत. अनाथ मुलांना कसलीही गरज लागली तर त्यांनी आमच्याकडे यावं. उद्या स्वतः फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही याची अधिकृत घोषणा करू. 18 वर्षानंतर मुलींच्या बाबतीत प्रचंड समस्या समोर येत आहेत. या मुलांच्या समुपदेशनासाठी आम्ही एक डॉक्टरांची टीम तयार करत आहोत आणि ते याबाबत काम करतील. जून महिन्यापासून बाहेर पडणारी जी मुलं आहेत त्यांची पूर्णपणे जबाबदारी आम्ही आमच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून उचलणार आहोत. यापुढे मुलांचे कसल्याही प्रकारचे हाल आम्ही होऊ देणार नाही. मागील जवळपास 2 वर्षांपासून आम्ही या प्रोजेक्टवर काम करत आहोत. नक्कीच आम्हांला त्यात यश मिळेल.