नागपूर/पंढरपूर : विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या विविध मुद्द्यांनी गाजत आहे. मात्र या हिवाळी अधिवेशनातील एका फोटोची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. हा फोटो आहे, शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांचा.


शेकापचे आमदार गणपतराव देशमुख वयाच्या 91 व्या वर्षीही अधिवेशनासाठी एसटीने प्रवास करतात, असं या व्हायरल फोटोत म्हटलं आहे. एसटीत आमदार, खासदारांसाठी जागा राखीव असते, मात्र याचा वापर झालेला तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटणाऱ्या या फोटोची एबीपी माझाने पडताळणी केली.

गणपतराव देशमुख अधिवेशनासाठी नागपूरला बसने गेले का, याची पडताळणी एबीपी माझाने केली. मात्र ते अधिवेशनासाठी नेहमीच ट्रेनने जातात, अशी माहिती मिळाली. गणपतराव देशमुख यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने एबीपी माझाने त्यांच्या मुलालाच याबद्दल विचारलं.

गणपतराव देशमुख दरवर्षी अधिवेशनासाठी ट्रेनने जातात. मात्र आमदार निवास ते विधानभवन हा प्रवास ते स्वतःच्या गाडीने करत नाहीत. उपलब्ध असलेल्या एसटी किंवा सरकारी वाहनाने ते तेथील प्रवास करतात. इतर आमदार स्वतःच्या गाडीने आमदार निवास ते विधानभवन प्रवास करतात.

सांगोला ते नागपूर हे जवळपास 700 किलोमीटर अंतर आहे. हा प्रवास करण्यासाठी अंदाजे 14 ते 15 तासांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे एखादा आमदार इतक्या तासांचा प्रवास बसने करणं कठीण आहे. त्यामुळे हा फोटो कमी अंतराच्या प्रवासानंतरचा असेल.

गणपतराव देशमुख आजही अधिवेशनासाठी एसटीने प्रवास करतात, असा दावा व्हायरल फोटोत करण्यात आला आहे. मात्र ते अधिवेशनाच्या काळात आमदार निवास ते विधानभवन प्रवास एसटीने करतात, असं एबीपी माझाच्या पडताळणीतून समोर आलं आहे. नागपूरला ते ट्रेननेच जातात.