पंढरपूर : शेतकऱ्यांच्या बांधावरचा शेतमाल थेट देशभरातील बाजारपेठेत नेणाऱ्या 100 व्या किसान रेलला 28 डिसेंबर रोजी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फेरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता. आता या सांगोला ते शालिमार या पश्चिम बंगाल पर्यंत जाणाऱ्या 100 व्या किसान रेलचा कार्यक्रम आता वादात सापडण्याची चिन्हे असून किसान व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.


या रेल्वेच्या कार्यक्रमामुळे आदर्श आचारसंहिता  भंग होत असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री पियुष गोयल, कृषी मंत्री नरेंद्र तोमर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आज कदम यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून यासह राज्य निवडणूक अयोग्य व राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडेही तक्रार देण्यात आली आहे. याची दाखल न घेतली गेल्यास उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा प्रफुल्ल कदम यांनी दिला आहे. आचार संहिता सुरु असताना कोणतीही उद्घाटन करू नयेत असे नियम असताना हे नियम थेट पंतप्रधान यांनी मोडल्याने यांच्यासह यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दिली आहे.


सांगोला भागातील डाळिंब, शिमला मिर्च, शेवगा आणि द्राक्षांना तर जेऊर, कंदर परिसरातील केळींना दिल्ली बाजारपेठेत चांगली मागणी आहे. या भागात मोठ्या प्रमाणात या दर्जेदार फळ व भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. सध्या सांगोल्यातून रोज 5 ते 6 बोगी भरून डाळिंब व इतर भाजीपाला दिल्लीला व देशभरातील इतर बाजारपेठेत जातो. किसान रेल मधून माल पाठवल्याने अतिशय जलद , सुरक्षित व स्वस्त दरात देशभरात माल जात असल्याने शेतकऱ्यांच्या गाठीला चार पैसे खुळखुळू लागले आहेत.


संबंधित बातम्या :



पंतप्रधान मोदींनी दिली सांगोल्याच्या शेतकऱ्यांना खुशखबर, आता आठवड्यातून दोन दिवस धावणार दिल्लीला किसान रेल