पंढरपूर : एका बाजूला दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी एकापाठोपाठ एक घोषणा व योजना आणण्यास सुरुवात केली आहे . दोन दिवसापूर्वी १०० व्या किसान ट्रेनला झेंडा दाखवताना पंतप्रधानांकडे सांगोल्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीला तात्काळ मंजुरी देत दोन वेळा दिल्लीला किसान रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .


सांगोला भागातील डाळिंब, शिमला मिर्च, शेवगा आणि द्राक्षांना तर जेऊर, कंदर परिसरातील केळींना दिल्ली बाजारपेठेत चांगली मागणी आहे. या भागात मोठ्या प्रमाणात या दर्जेदार फळ व भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. सध्या सांगोल्यातून रोज 5 ते 6 बोगी भरून डाळिंब व इतर भाजीपाला दिल्लीला व देशभरातील इतर बाजारपेठेत जातो. किसान रेल मधून माल पाठवल्याने अतिशय जलद , सुरक्षित व स्वस्त दरात देशभरात माल जात असल्याने शेतकऱ्यांच्या गाठीला चार पैसे खुळखुळू लागले आहेत. सांगोल्यातून काही दिवसापूर्वी निघालेल्या 100 व्या किसान ट्रेनला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत शेतकऱ्यांच्या या उपक्रमाला केंद्र सरकारची साथ असल्याचे दाखवून दिले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिल्लीसाठी किसान रेलच्या फेऱ्या वाढवण्याची आग्रही मागणी केल्यावर शेतकऱ्यांची मागणी खासदार रणजित निंबाळकर यांनी पंतप्रधानांकडे पोहोचवली होती . यानंतर तात्काळ पंतप्रधानांनी रेल्वे विभागाला सूचना देत सांगोल्यातून दोन वेळा दिल्ली किसान रेल सुरु केली आहे .


आता दर मंगळावर व शनिवारी ही किसान रेल दिल्लीसाठी सांगोला स्टेशनवरून धावणार असून यामुळे शेतकऱ्यांचा ताजा शेतमाल दिल्लीच्या बाजारपेठेत विकला जाणार आहे . पंतप्रधानांच्या या निर्णयाचे सांगोल्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून याचा फायदा सांगोल्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.


संबंधित बातम्या :