नवी दिल्ली : राज्यसभेतील शिवसेना खासदारांची बैठक व्यवस्था बदलल्याचं माझ्या कानावर आलं आहे, अशी माहिती शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचं कारस्थान भाजप करत आहे. ही दुर्बुद्धी भाजपाला सुचलेली आहे, अशा शब्दात विनायक राऊत यांनी टीका केली आहे.

लोकसभेतली बैठक व्यवस्था ज्यावेळी बदलेल त्यावेळी आम्ही ती स्वीकारू, असेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचा NDA च्या बैठकीवर बहिष्कार नाही. भाजपनेच आम्हाला या बैठकीचं आमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्नच येत नाही. लोकसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत आम्हाला अधिकृत आमंत्रण आहे त्याला आम्ही जाणार आहोत, असेही राऊत यांनी सांगितले.

एनडीएची स्थापनाच मुळी बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांमुळे झाली होती. ज्यावेळी भाजपला कोणी विचारत नव्हतं त्यावेळी शिवसेनेनं आधार दिला, असेही राऊत म्हणाले. ज्या आधारावरती ते मोठे झाले त्यालाच नाव ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्या कर्माची फळ भोगणारच, असेही राऊत म्हणाले. आता विधेयकांवर विषयानुरूप आम्ही आमची भूमिका ठरवू, असे देखील ते म्हणाले.

खासदार विनायक राऊत यांच्या माहितीनुसार जर राज्यसभेत बैठक व्यवस्था तातडीने बदलली जात असेल तर संजय राऊत विरोधी बाकावर दिसणार आहेत.


दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार नसल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली होती. तर शिवसेनेला या बैठकीचं अद्याप निमंत्रण मिळालं नसल्याचीही चर्चा समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेवरून दोन्ही पक्षात निर्माण झालेली दरी राष्ट्रीय पातळीवरही वाढणार असल्याची चिन्ह आहेत.
येत्या सोमवारपासून (18 नोव्हेंबर) संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएच्या सर्व घटक पक्षांची उद्या बैठक पार पडण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेतील दुरावे पाहता अधिवेशनात शिवसेनेची विरोधी भूमिका भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभा आणि राज्यसभेत बैठक व्यवस्थाही बदलली जाणार का? आणि शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर दिसणार का? याची आता उत्सुकता आहे.