मुंबई : सत्तेत सहभागी करुन घेण्याचं आश्वासन भाजपनं पाळलं नाही. त्यामुळे संघर्ष सुरुच ठेवू असं म्हणत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि भाजपविरोधात दंड थोपटल्याचं दिसतंय.

 

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात विनायक मेटेंना ठेंगा दाखविण्यात आला. त्यानंतर मेटेंनी आपली नाराजी जाहीरपणे बोलवून दाखवली. मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धोक्याची भावना बळावल्याचा आरोप मेटे यांनी केला. शिवाय आज विधानपरिषदेतल्या आमदारकीच्या शपथविधीला विनायक मेटे हजर राहिले नाहीत.

 

मित्रपक्षांपैकी महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांना मंत्रिपदं मिळाली, मग मलाच का डावललं? मुख्यमंत्री आणि भाजपनी दिलेला शब्द का पाळला नाही, असा सवाल मेटेंनी केला.

 

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधानपरिषदेत पार पडला. दिवाकर रावते, रामराजे निंबाळकर, नारायण राणे, सुभाष देसाई, सदाभाऊ खोत अशा नेत्यांनी आज विधानपरिषदेत शपथ घेतली. मात्र मेटेंनी या सोहळ्याला दांडी मारली.

 

दरम्यान, भाजपनं आपल्या उर्वरित दोन मित्रांना सुखद धक्का दिला. रासप अर्थात राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांना कॅबिनेट मंत्रिपंद तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रीपदाची शपथ दिली गेली.