नाशिक : अवघ्या २० महिन्यात नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळं नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी या बदलीविरोधात वेगवेगळी आंदोलन सुरु केली आहेत. इतकंच नाही तर रक्तदान करून अनोख्या पद्धतीने गेडाम यांच्या बदलीचा निषेध नोंदवण्यात येत आहे.

 

दुसरीकडे मनपातील सफाई कर्मचारीही गेडाम यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.

 

बिल्डरांचं कपाट प्रकरण असो किंवा अतिक्रमण विरोधी कारवाई असो किंवा भाजीबाजारावर चालवलेल्या बुलडोझर असो, आदी कारवाईमुळं गेडाम चर्चेत आले. एवढंच नाही तर गेडाम यांनी कामचुकार अधिकाऱ्यांवरही कारवाईचा धडाका लावला होता.

 

या सगळ्या कारवाईंमुळं गेडाम यांच्या बदलीसाठी अनेकांचा खटाटोप सुरु होता. कपाट प्रकरणी गेडाम यांनी केलेली कारवाईच बदलीसाठी कारणीभूत असल्याची चर्चा नाशकात सुरु आहे.

 

दरम्यान, गेडाम यांची सहाय्यक विक्रीकर आयुक्त मुंबई या पदावर बदली झाली आहे. तर अभिषेक कृष्णा यांची नाशिक पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

डॉ. प्रवीण गेडाम यांची यशस्वी कारकीर्द

 

-पदभार घेताच दांडीबहाद्दर अधिकारी,कर्मचाऱ्यांना शिस्त लावली

- सिंहस्थ कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन

- सिंहस्थापूर्वीच शहारातील महत्वाचे रस्ते मुक्त अतिक्रमण केले

- शहरातील तीन हजार अतिक्रमणांवर हातोडा

- बिल्डरांच्या अनधिकृत कपाट प्रकरणांना चाप लावला

- अडीच हजार अनधिकृत इमारतींचे परवाने थांबविले

- 265 कोटीची मुकणे पाणीपुरवठा योजना मार्गी लावली

- स्मार्ट सिटी योजनेसाठी प्रयत्न

- 202 कोटीची वादग्रस्त एलईडी योजना थांबवली

- महापालिकेचा कारभार संगणकीकृत केला.

- महापालिकेचा कारभार ऑनलाईन करत,स्मार्ट नाशिक अॅप लॉन्च

- शहरातील इमारतींचे नकाशे ऑनलाईन उपलब्ध केले.

- शहरातील मिळकतींचे सर्व्हेक्षण केले.

- उत्पन्न वाढीसाठी शहरातील दोन हजार गाळ्यांचे सर्व्हेक्षण

- मनपाच्या 903 मिळकती रेकॉर्डवर आणल्या

- महापालिकेला आर्थिक शिस्त लावली.

- पालिकेतील भ्रष्ट अधिका-यांच्या विरोधात थेट पोलीसात गुन्हे नोंदविले.

- दुष्काळ आणि टंचाईच्या काळात गंगापूर धरणातील पाण्याचे यशस्वी नियोजन केले.

- घंटागाडी योजना लावली मार्गी