गुलाबराव पाटील..... एक साधा, निष्ठावंत शिवसेना कार्यकर्ता... बाळासाहेबांच्या आवाहनाने झपाटून भगवं उपरणे गळ्यात घालून जग बदलायला निघालेल्या तेव्हाच्या सैनिकांच्या फौजेतला हा एक शिवसैनिक... साधा टपरी चालक!




जळगावनजीकच्या पाळधी या छोट्याशा खेड्यात नशीब पान सेंटर चालवणारा हा माणूस कधी आमदार झाला ते त्याचं त्याला सुद्धा कळलं नाही. खरेतर गुलाबराव हा शिवसेनेचा सभागृहातील व बाहेरही अत्यंत आक्रमक चेहरा; ते यापूर्वीच आमदार व्हायला हवे होते. कदाचित तेव्हा नशीब रुसलेले असेल त्यांच्यावर...

 

गुलाबराव पाटील हा कधी काळी गावोगावी होणाऱ्या तमाशामध्ये काम करणारा आणि वेळ मिळेल तेव्हा नशीब पान सेंटर चालवणारा माणूस... आयुष्यात तसं नशीब आजवर त्याच्यावर रुसलेलं होतं जणू!!



गुलाबराव यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त, सनसनाटी अन संघर्षाची!! चेहऱ्यावर सदैव दाढी आणि मोठे-मोठे डोळे असलेला हा माणूस प्रथमदर्शनी रागीट वाटत असला तरी मनातून अगदी मृदू आणि शांत असल्याचा अनुभव त्यांना ओळखणाऱ्या लोकांना नक्की आहे.

 

अस्सल गावरान मातीतील, काळ्या आईप्रति न शेतकऱ्याविषयी खरी कळकळ, तळमळ, आस्था व जिव्हाळा असणारा माणूस म्हणून देखील त्यांची ओळख आहे.. मतदारसंघात कोणाकडेही लग्न किंवा निधन झाले असेल तर हा माणूस तिथे हजर असतो. पण फक्त लग्न नं मरण-धरण नव्हे तर कार्यकर्ते, मतदार, शेतकरी यांच्यासाठी हा माणूस रात्री-पहाटे धावून जातो. त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सरकारी यंत्रणा, गुन्हे अंगावर घेतो...



गेल्या निवडणुकीत गुलाबराव पाटील अगदी काही मतांनी पराभूत झाले तरीही त्यांनी आपली कार्यपद्धत सोडली नाही किंवा जनतेला वाऱ्यावर सोडले नाही. तेव्हा आमदार अनेक ठिकाणी सुख-दुःखात अनुपस्थित असायचा मात्र माजी आमदार नेहमी हजर असायचा...!!

 

आता आमदार असूनही रस्त्यात कुठेही थांबणारा आणि गरजू प्रत्येकाला मदत करणारा हा माणूस... आजही पाळधीत गेलात की मुंबईतल्या शिवसेना शाखेसारखी सकाळपासून गर्दी असते. लेक-सून नांदवत नाही, नवरा त्रास देतो अशी घरातली भांडणं ते बांधावरच्या न गावातल्या कुरबुरी, सरकारी कामे, आरोग्य सेवा ... अशी जणू कोणतीही कामे लोकं घेऊन येतात. गुलाबभाऊ आपलं काम करेल, न्याय देईल हा विश्वास असतो. सरकारी कार्यालयातले लालफिती, निगरगठठ भाई या भाऊसमोर चळाचळा कापतात.



राज्यमंत्र्याला अधिकाराच्या मर्यादा असल्या तरी गुलाबभाऊंना जे अधिकार मिळतील ते फक्त सामान्य लोकांसाठी वापरले जातील आणि हा लाल दिवा हा सामान्य माणसासाठी असेल, असा विश्वास जिल्ह्यातील जनतेला, शेतकऱ्याला आहे.

 

3 वेळा आमदार असून या माणसाने कधी स्वतःच्या कुटुंबासाठी लाभ घेतले नाहीत की घरात पदे नं सत्तेचं मेतकूट वाटून खाल्लं नाही. या आमदाराचा पोरगा आजही रोजी-रोटीसाठी नोकरी करतो, त्याची पत्नी व घरची शेतात राबतात... केवळ नावात भाऊ असून कुणी भाऊ होत नाही. ते अधिष्ठान आपल्या कर्मातून मिळतं... तळमळ, त्याग व निष्ठेतून मिळतं..



स्वर्गीय शिवसेनाप्रमुख आणि काळी आई व तिची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला स्मरून गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जळगाव जिल्ह्याला कुठलाही अहंकार, माज व मस्ती नसलेला आणखी एक नवा मंत्री लाभलाय... सभागृहात आता शिवसेनेला खणखणीत, दणदणीत आणि बुलंद आवाज लाभलाय....