बेळगाव: दारुबंदी असलेल्या गावात चोरन दारु विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला दारु विकताना रंगेहाथ पकडून त्याचं अर्धमुंडन करुन गळ्यात चप्पलांचा हार घालून गावातून धिंड काढल्याचा प्रकार घडला आहे.

 
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील हल्ळूर गावामध्ये हि घटना घडली. रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने महिलांनी दारूबंदीसाठी गावात पुढाकार घेतला होता. या प्रयत्नातून गावामध्ये दारुबंदीही करण्यात आली होती. मात्र, गावात दारुबंदी असतानाही एक व्यक्ती दारु विक्री करत असल्याचं गावातील महिलांना आढळून आलं.

 

या यानंतर संतप्त महिलांनी एकत्र येऊन दारू विक्रेत्यास चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विक्रेत्याला पकडलं. यामध्ये फक्त महिलाच सहभागी नव्हत्या तर गावातील तरुणांनीही यासाठी पुढाकार घेतला होता. दारु विक्रेता सापडल्यानंतर त्याला कायमचा धडा शिकवण्यासाठी चक्क त्याचे अर्धमुंडन करण्यात आलं. संतप्त नागरिक एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्याच्या गळ्यात चप्पलांचा हार घालून संपूर्ण गावातून धिंडही काढली. जेणेकरुन यापुढे कुणीही अशाप्रकारचं कृत्य करु नये.