सर्वाधिक कॉपीबहाद्दर औरंगाबादेत, तर तोतयेगिरीत नाशिक विभाग अव्वल
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 06 Jun 2016 10:35 AM (IST)
मुंबई : राज्याच्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 89.56 टक्के लागला आहे. निकाला 51,281 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मात्र त्याचवेळी कॉपी आणि तोतयेगिरीची (डमी) प्रकरणंही समोर आली आहेत. राज्यात एकूण 16,01,406 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 922 कॉपीची प्रकरणं असून 13 प्रकरणं तोतयेगिरीची आहेत. सगळ्यात जास्त कॉपीबहाद्दर औरंगाबादमध्ये असून मुंबई विभागात हे प्रमाण सर्वात कमी आहे. तर तोतयेगिरीमध्ये नाशिक विभाग अव्वल ठरलं आहे. औरंगाबादमध्ये कॉपीचे 314 प्रकरणं समोर आली आहेत. या विभागात एकूण 1,73,160 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यावेळी मुंबईत कॉपीचं प्रकणत सर्वात कमी असल्याचं उघड झालं आहे. मुंबई विभागात 3,23,955 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 18 जण कॉपी करताना आढळले. तर डमी अर्थात तोतयेगिरीमध्ये नाशिक विभाग अव्वल असल्याचं दिसून आलं आहे. या विभागात एकूण 9 प्रकरणं उजेडात आली आहेत. यानंतर पुणे (2), औरंगाबाद (1) आणि लातूरचा (1) क्रमांक लागतो. नाशिक विभागात 1,98,604 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती आणि कोकण विभाग डमीच्या बाबतीत क्लीन असल्याचं दिसतं.