मुंबई : एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या दहा दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळे पत्ते आपल्याकडे राखून ठेवले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देऊन, मुख्यमंत्री धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

 

याशिवाय येत्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी नेहमीप्रमाणे मित्रपक्षातील सदाभाऊ खोत, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांच्या नावाची चर्चा आहे.

 

कोअर कमिटीची बैठक

दरम्यान, खडसेंच्या राजीनाम्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी भाजपाची आज कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, संघटनमंत्री व्ही सतीश सहभागी होणार आहेत.  या बैठकीला एकनाथ खडसेही हजर राहण्याची शक्यता आहे.

 

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 12 आणि 13 जूनला अलाहाबादमध्ये होत आहे. तर राज्यातील कार्यकारिणीची बैठक 18 आणि 19 रोजी पुण्यात होणार आहे. त्यामुळे या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

 

..म्हणून मंत्रिमंडळ विस्तार तातडीने?

पावसाळी अधिवेशन 18 जुलैला सुरु होणार असल्यामुळे किमान नवीन मंत्र्यांना खात्यांचा पदभार स्वीकारून, कामकाज समजण्यासाठी तेवढा वेळ मिळायला हवा, त्यामुळे विस्तार लवकरात लवकर होईल अशी चर्चा आहे.

 

सध्याचं मंत्रिमंडळ

- मंत्रिमंडळाचे सध्याचे संख्याबळ मुख्यमंत्र्यांसह २९ इतके आहे.

- नियमानुसार मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४२ जणांचा समावेश होऊ शकतो.

-म्हणजे आणखी १३ जणांना मंत्रिपद दिले जाऊ शकते.

- यामध्ये शिवसेनेची दोन मंत्रिपदे रिक्त आहेत, शिवसेना अधिक जागा मागण्याची शक्यता आहे, पण भाजप त्यासाठी सध्या तयार नसल्याचं चित्र आहे.

- भाजप आपल्या कोट्यातील 2-3 जागा रिक्त ठेवू शकते.

- भाजप स्वतःची 8 पैकी 3 मंत्रिपदं मित्र पक्ष सदाभाऊ खोत, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांना देऊ शकेल.

- त्यामुळे उरलेल्या 5 जागांवर भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देईल.

- आता ज्या मंत्र्यांकडे भार आहे त्यातील भार हलका होईल.

- मंत्रिमंडळ विस्तारात सांगली, नाशिक, मराठवाडा, पूर्व विदर्भ असं प्रत्येकी एक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता.

- मुंबई महापालिका निवडणूक समोर असल्यामुळे, मुंबईतील नेत्यांना  संधी मिळू शकते, अशीही चर्चा आहे.

- एकनाथ खडसे राजीनामा झाल्यामुळे जळगावमधून हरिभाऊ जावळे यांना संधी मिळू शकते अशीही चर्चा आहे.

- मंत्रिमंडळाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्व पत्ते आपल्याकडे राखून ठेवल्यामुळे, इतर कोणीही या विषयावर टिप्पणी करणं टाळत आहेत.

- मुख्यमंत्री चर्चेत नसलेल्या नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन, सगळ्यांना पुन्हा धक्का देऊ शकतात, अशीही चर्चा आहे.