बीड : एड्सग्रस्त मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. एड्सग्रस्त असलेल्या बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर तो राहत असलेल्या गावातील लोकांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. त्यानंतर या मुलाच्या आईने एड्स बाधित मुलांसाठी काम करणाऱ्या इन्फंट इंडिया या संस्थेच्या मदतीने मुलावर अंत्यसंस्कार केले.

बीड जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या 42 वर्षीय एड्सग्रस्त महिलेला दोन मुले होती. त्यातल्या मोठ्या मुलाचा सहा वर्षांपूर्वीच एड्समुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर काल या महिलेच्या दुसऱ्या 12 वर्षाच्या मुलाचा काल मृत्यू झाला. मात्र त्याच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी या मुलावर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे हतबल झालेल्या महिलेने अखेर इन्फंट इंडिया या संस्थेच्या मदतीने तिच्या गावापासून पन्नास किलोमीटर अंतरावर आपल्या मुलावर अंत्यसंस्कार केले.

गेल्या पाच वर्षांपासून गावकऱ्यांनी आपल्याला वाळीत टाकले होते. तसेच याबाबत पोलिसांत तक्रार केली असता गावकऱ्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप या महिलेने केला आहे.

एड्सबाबत एकीकडे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरु असताना अशा प्रकारचा धक्कादायक घटनाही घडत आहेत. या घटनेचा अनेकांकडून निषेध करण्यात येत आहे.