कोल्हापूर : गेली पाच दिवसांपासून कोल्हापूरचा संपर्क इतर जिल्ह्यांशी तुटला होता. पुराचं पाणी रस्त्यांवर आल्यामुळे कोल्हापूर शहरात पाणीटंचाईसोबत पेट्रोल टंचाई निर्माण झाली होती. तसंच चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. मात्र पुणे-बंगळुरु महामार्ग सुरु झाल्यानंतर पेट्रोलचे टँकर आल्यामुळे पंप सुरु झाले. पेट्रोल घेण्यासाठी अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी तुफान गर्दी केली. नागरिकांनी एका बाजूला दुचाकी तर दुसऱ्या बाजूला हातात बाटल्या घेऊन गर्दी केली आहे. तसंच पेट्रोल कमी-जास्त मिळत असल्याने नागरिकांमध्ये वादही होत आहेत.


तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना चारा नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. आजरा तालुक्यातील आरळगुंडी गावात चारा वाटप करण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे लोकांनी रांगा लावल्या. यावरुन हा प्रश्न किती गंभीर आहे हे स्पष्ट होतं.


आठवड्याभराने पुणे-बंगळुरु महामार्ग सुरु
पुरामुळे तब्बल आठवडभर बंद असलेल्या पुणे-बंगळुरु महामार्गावर अडकलेल्या अवजड वाहनांची वाहतूक सुरु झाली आहे. शिरोली फाटा परिसरात पाण्याची पातळी कमी होत असल्याने ट्रकची वाहतूक सुरु करण्यात आली. कराड ते कोल्हापूर या मार्गावर अडकलेले हजारो ट्रक पुराच्या पाण्यातून वाट काढत बंगळुरुच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर वाहनातून दुसऱ्या बाजूला जाता यावं, यासाठी अनेक नागरिकांची धडपड सुरु आहे.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे आठवड्यापासून बंद असल्यामुळे सातारा ते कर्नाटकातील तवंदी घाट या दरम्यान किमान 35 हजार वाहने सात दिवसापासून अडकून पडली होती. रविवारी (11 ऑगस्ट) रात्री थोडं पाणी कमी झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेला प्राधान्य देत काही टँकर सोडण्यात आले. दिवसभरात या महामार्गावरुन पाणी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि औषधे या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्या सोडण्यात आल्या. अखेर आज पाणी कमी होत असल्याने ट्रक सोडण्यात आले.