रत्नागिरी : चिपळुणमधील तिवरे धरण फुटून 23 जणांचा जीव गमवावा लागला. काही जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र याच प्रकरणात प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणणारं पत्र 'एबीपी माझा'च्या हाती लागलं आहे. तिवरे धरणाच्या पायथ्याला असलेल्या भेंदवडीचे ग्रामस्थ अजित चव्हाण यांनी 5 महिन्यांपूर्वी धरणाबाबतच्या धोक्यासंदर्भात प्रशासनाला पत्र लिहिलं होतं.


दु:खद बाब म्हणजे तिवरे दुर्घटनेत अजित चव्हाण यांनी आपले आई-वडील, भाऊ, वहिनी आणि पुतणी गमावली. धरणाला भगदाड पडलं असून पाण्याची गळती सुरु आहे, असा स्पष्ट उल्लेख असलेलं पत्र अजित चव्हाण यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना लिहिलं होतं. मात्र या पत्रानंतरही अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही.


अजित चव्हाण यांच्या पत्रव्यवहारानंतर तिवरे धरणाच्या दुरुस्तीची ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र तसं काहीही झालं नाही आणि 23 निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले.



सरकारकडून चौकशी पथकाची स्थापना


दुर्घटनेची गंभीर दखल घेत जलसंपदा विभागाने सखोल चौकशीसाठी पथक स्थापन केलं आहे. तिवरे धरण फुटल्याने झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीची उच्चस्तरीय सखोल चौकशी व्हावी यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील या पथकाला दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


संबंधित बातम्या