सातारा : साताऱ्यातील जखीणवाडीचे ग्रामस्थ विलास चव्हाण यांनी पितृपक्षानिमित्त वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून महाळ घातला. नैवद्य तयार केला. आवाज काढून कावळ्याला विनवणी केली. पण कावळा काही फिरकला नाही. अखेर दोन चिऊताई आल्या आणि त्यांनी नैवैद्याला तोंड लावलं.

पण हा प्रश्न एकट्या विलास चव्हाण यांचा नाही तर जखीणवाडी गावावर मागच्या 25 वर्षांपासून कावळा रुसला आहे. हीच अवस्था जखीणवाडीतल्या पंचक्रोशीतही आहे. पक्ष पंधरवड्यासाठी कावळे गावात यावे म्हणून अनेक प्रयोग करुन झाले. पण कावळा काही केल्या ऐकायला तयार नाही.

पितृपक्ष पंधरवडा आणि कावळा यांचा संबंध जुना आहे. त्याची आख्यायिकाही सांगितली जाते. मात्र गावात कावळा नसणं हे स्वच्छतेचं लक्षण आहे. असं वन्यजीव अभ्यासकांना वाटतं आणि त्यासाठी ते गावकऱ्यांचं कौतुकही करतात.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मात्र आत्मा नसतो आणि त्याचा पितृपक्षाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. जिवंत असताना आई वडिलांची सेवा करा बाकी काही गरज नाही, असा सल्लाही ग्रामस्थांना दिला जातो.

हिंदू धर्मात कावळा आणि आत्म्याचा संबंध जोडला गेला आहे. त्यामुळे शेकडो वर्षांपासून श्राद्ध असो की पितृपक्ष या विधीत काकस्पर्श आवश्यक मानला जातो. पण जखीणवाडी गावावर रुसलेला कावळा कधी खूश होणार? याचं कोडं उलगडत नाही.