'ते' व्यंगचित्र छापलं नसतं, तर बरं झालं असतं : नीलम गोऱ्हे
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2016 05:20 PM (IST)
अहमदनगर : 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातील ज्या व्यंगचित्रावरुन गदारोळ निर्माण झाला आहे, ते आलं नसतं तर बरं झालं असतं, असं मत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे. हे आपलं वैयक्तिक मत असून, प्रवक्त्याला व्यक्तिगत मत नसल्याची जाणीव असूनही आपण हे सांगत असल्याचंही गोऱ्हे म्हणाल्या. श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी 'सामना'च्या वर्तमानपत्रात रेखाटलेलं व्यंगचित्र छापलं गेलं नसतं, तर बरं झालं असतं, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ते रेखाटलं नसावं, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत त्याबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करतील. वर्तमानपत्रात काय छापावं आणि काय छापू नये, याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अखत्यारित असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या किंवा कुठल्याही समाजातील भगिनींच्या भावना दुखावण्याचं काम 'सामना'तून कधीही केलं जात नाही, त्यामुळे कोणीही कुठल्याही प्रकारचे गैरसमज करुन घेऊ नयेत, असं कळकळीचं आवाहन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सामनातील व्यंगचित्राबाबतची अधिकृत भूमिका पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत स्पष्ट करतील, त्यामुळे जो प्रश्न एसपीला विचारायला हवा, तो कॉन्स्टेबलला विचारुन उपयोग नाही, असंही नीलम गोऱ्हेंनी सांगितलं.