सेनगाव तालुक्यातील ताकतोडा हे 3000 हजार लोकसंख्या वस्ती असलेले गाव आहे. शेती हेच त्यांच्या एकमेव उदरनिर्वाहाचे साधन आहे. शेती कोरडवाहू असल्याने आणि सतत दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. हंगामी पावसाचे चार थेंब आल्यावर कपाशी, सोयाबीन अशी पीकं घेतली जायची. मात्र गेली सलग चार वर्षे या गावाकडे पाऊस फिरकलाच नाही.
यंदाही जुलै महिना संपत आला तरी पाऊस आलेला नाही. पाण्याअभावी पेरणी केलेली पीकं सध्या करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. बँकांच्या आडमुठ्या धोरणामुळे पीककर्जापासून शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी खासगी बँकांचे, सावकाराचे कर्ज काढून पेरण्या केल्या आहेत. सलग तीन ते चार वर्षापासून पीक संरक्षण विमा देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी शेवटचा मार्ग काढून एकत्र येत ताकतोडा गाव विक्रीला काढले आहे. मागण्या मान्य करा अथवा संपूर्ण गावाला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
काय आहेत नागरिकांच्या मागण्या
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी.
- पीकविमा मिळावा.
- हिंगोली जिल्हा केंद्रशासित घोषित करावा
- हिंगोली जिल्ह्यात एमआयडीसी सारखे प्रकल्प राबवावे
- गावावरील खाजगी फायनान्स कर्ज माफ करावे