प्रश्न :- जन आशीर्वाद यात्रेची फलश्रुती काय? कशासाठी ही आशीर्वाद यात्रा आहे?
राऊत - महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधण्याचे कार्यक्रम आहेत. उद्याच्या निवडणुकांशी यांचा संबंध नाही. आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू आहेत. नव्या दमाचा चेहरा आहे. ठाकरेंना फोकस करण्याची गरज नाही. गेल्या 50 वर्षापासून ठाकरेंवर सर्वांचा फोकस आहे.
प्रश्न - आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी / प्रमोट करण्यासाठी ही यात्रा आहे का?
राऊत - देशात अनेक युवा नेते आले आणि गेले पण आदित्य प्रवाहात आहेत. आदित्य हे सर्व क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला आहे. त्यांना प्रश्न सोडवायला आवडतात. ते अनेकांच्या भेटीगाठी घेतात.
प्रश्न - आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात कधी उतरणार?
उत्तर - तो निर्णय पक्ष घेईल. संपूर्ण पक्ष त्याचं नेतृत्व मान्य करतं. उद्या ते पक्षाचं भविष्य आहेत. आतापर्यंत ठाकरेंमध्ये कुणी निवडणूक लढलं नाही. अनेकांना पदं दिली. आदित्य हे नवीन पिढीतले नेते आहेत. आमचा हट्ट आहे हि इतिहासाची शृंखला मोडावी.
प्रश्न - आदित्य ठाकरेंना याबद्दल काय वाटतं?
राऊत - पक्ष हा पक्षप्रमुखांवर चालतो. त्याशिवाय ते त्यांचे वडील आहेत. मला आशा आहे उद्धव ठाकरे हे आदित्यबद्दल सकारात्मक निर्णय घेतील.
प्रश्न - तुम्हाला वाटतं का, भाजपकडून तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं जाईल?
राऊत - मीडियानं कितीही प्रयत्न केलं तरी आम्ही यावर काहीही बोलणार नाही. अमित शाह, मुख्यमंत्री किंवा नवीन अध्यक्ष याबाबत काहीही बोलले नाहीत. दोघांमध्ये कुठेही मतभेद नाही. जागावाटप झालेलं आहे. चंद्रकांत दादा आता अध्यक्ष झालेले आहेत. त्यांच्यापर्यंत काही विषय आले नसतील. जागा वाटपसंदर्भात कोणताही तिढा नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही वाद नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. याबाबत उद्धव ठाकरे, अमित शाह, आणि मुख्यमंत्री एका सूरात हे बोलले आहेत. हा सूर बेसूर होणार नाही. 2014 ची पुर्नरावृत्ती होणार नाही. दोन्ही पक्ष हातात हात नाही तर गळ्यात गळे घालून काम करतील.
प्रश्न :- आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान होतील?
राऊत - जसं आम्हाला वाटलं की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी असावेत तर भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असं भाजपचे लोक ही बोलतील. राज्याच्या राजकारणात सर्वोच्च पद सर्वांनाच हवं असतं.
प्रश्न -: राजकारणात तुमचा अनुभव मोठा आहे, तुम्हाला वाटतं आपल्या पक्षाचं मुख्यमंत्री पद हे दुसऱ्या पक्षाला दिलं जाईल?
राऊत - मुख्यमंत्रीपदासाठी बहुमत असावं लागतं. जसं केंद्रात जसं बहुमत आहे तसं इकडेही लागेल. आम्ही राज्यात जुळ्या भावाप्रमाणे काम करतोय. लोकं आश्चर्याने पाहत आहेत. आता आम्ही जुळे भाऊ आहोत. महाराष्ट्राच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत.