मुंबई: महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर थकबाकी असलेल्यांच्या यादीत माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची भर पडली आहे. माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि विद्यमान भाजप आमदार असलेल्या गावितांनी सरकारचे तब्बल 44 लाख रुपये थकवले आहेत.
माजी मंत्री आणि शासकिय अधिकाऱ्यांनी शासकीय निवासस्थानापोटी थकवलेल्या रकमेची माहिती, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवली होती. त्यात हा खुलासा झाला.
तत्कालीन मंत्री असलेल्या विजय कुमार गावित यांना सरकारनं सुरुची सदनिका क्रमांक 3 दिली होती. 20 मार्च 2014 रोजी गावितांना मंत्रीपदाला मुकावं लागलं. पण त्यांनी सदनिका सोडली नाही. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी 29 जुलै 2016 रोजी गावितांनी सदनिका सोडली. या काळात दंड रुपातील 44 लाख रुपये त्यांनी भरलेले नाहीत.
सार्वजनिक बांधकाम खात्याने गावित यांना 2 जानेवारी 2017 रोजी नोटीस बजावून 43 लाख 84 हजार 500 इतकी थकबाकीची रक्कम अदा करण्यास सांगितले आहे.
अनिल गलगली यांनी अशाप्रकारे थकबाकीची रक्कम अदा न करणाऱ्या भाजपाच्या आमदाराचा दरमहा दिला जाणारा पगार रोखण्याची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे शासकीय थकबाकी अदा न केल्यास जनतेत चुकीचा संदेश जाण्याची भीती गलगली यांनी व्यक्त केली आहे.