बीड : तब्बल 26 कोटी रुपयाच्या पतपेढी भ्रष्टाचार प्रकरणी फरार असलेला विजय अलझेंडे अखेर तीन वर्षानंतर पोलिसांना शरण आला आहे. हे प्रकरण बीड जिल्ह्यातील माजलगाव इथल्या परिवर्तन मल्टीस्टेट बँकेचे असल्याचे कळत आहे. 


माजलगाव येथे सर्वसामान्यांच्या 26 कोटींच्या ठेवी बुडवून फरार झालेला परिवर्तन मल्टीस्टेटचा मुख्य आरोपी विजय उर्फ भारत आलझेंडे हा मंगळवारी माजलगाव न्यायालयात शरण आला. परिवर्तन मल्टीस्टेट पतसंस्थेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्यानंतर तब्बल तीन वर्षे फरार राहणाऱ्या विजय अलाझेंडेला अटक करण्यास पोलीस प्रशासनाला अपयश आले होते.


परिवर्तन मल्टीस्टेट बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणी यापूर्वीच अनेकांना पोलिसांनी बेड्या घातल्या मात्र विजय लाल झेंडे खरा सूत्रधार होता, ज्यानं शरणागती पत्करल्यानंतर आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 


माजलगाव शहरातील परिवर्तन मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी ही तीन वर्षापूर्वी ठेवीवर सर्वाधिक व्याजदर देणारी पतसंस्था म्हणून नावारूपाला आल्याने अनेकांनी आयुष्यभराची पुंजी या पतसंस्थेत ठेवली होती. या पतसंस्थेच्या पुणे, बीड, परभणी, पाथरी शहरासह ग्रामीणभागात 18 शाखा होत्या. जास्त व्याजदराच्या मोहापायी शेकडो ठेवीदारांनी जवळपास 26 कोटी रुपयाच्या ठेवी या मल्टीस्टेटमध्ये ठेवल्या होत्या.


भूमाफियांकडून कोरोना काळात केलेल्या 9 हजारहून अधिक अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई  


तीन वर्षापूर्वी विजय अलझेंडे याने ठेवीची विल्हेवाट लावत पतसंस्थेतेला टाळे ठोकून गाशा गुंडाळत फरार झाला. पतसंस्थेला अचानक कुलूप लागल्याने हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी एकच गर्दी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठेवीदारांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत विजय अलझेंडेसह 27 संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.