कल्याण : एकीकडे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच त्यात पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. उल्हासनगरच्या एका चादरी आणि पडदे विकणाऱ्या दुकानदाराने भन्नाट शक्कल लढवली आहे. एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक लीटर पेट्रोल फ्री देण्याची ऑफर त्याने सुरु केली आहे. त्याच्या या ऑफरला ग्राहकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


उल्हासनगरच्या शिरू चौकात असलेल्या शीतल हँडलूम या दुकानाच्या मालकानं ही नवी ऑफर सुरु केली आहे. या दुकानात चादरी आणि पडदे विकले जातात. दुकानाचे मालक ललित शिवकानी यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक लीटर पेट्रोल फ्री ही आगळीवेगळी ऑफर सुरु केली आहे. यासाठी 17 सेक्शनच्या एचपी पेट्रोलपंपासोबत दुकानमालकाने टायअप केलं आहे. या दुकानातून एक हजार रुपयांच्या चादरी किंवा पडदे विकत घेतल्यास तर ग्राहकांना एक लीटर पेट्रोलचं एक कुपन दिलं जातं. हे कुपन पेट्रोलपंपावर दिल्यास एक लीटर पेट्रोल मोफत मिळणार आहे. याबाबतचा फलक मालक ललित शिवकानी यांनी दुकानाच्या बाहेरसुद्धा लावला आहे. या ऑफरला ग्राहकांमधूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत 28 ग्राहकांनी 1 हजारांपेक्षा जास्त खरेदी करत हे कुपन मिळवलं आहे. त्यांच्या या ऑफरची सध्या उल्हासनगरमध्ये चर्चा रंगली आहे.


वर्धापनदिनानिमित्त मनसेकडूनही पेट्रोलवर सूट 


आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पंधरावा वर्धापन दिन आहे. मात्र, यावर्षी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षीचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने कोणताही मोठा कार्यक्रम मनसेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला नाही. त्यामुळे आजच्या वर्धापनदिनी वडाळ्यातील मनसे कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना एका वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करायचे ठरवले आहे. यासाठी मनसेने एक उपक्रम हाती घेतला यामध्ये दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत असताना कुठलाही दिलासा सर्वसामान्य लोकांना ना राज्य सरकारकडून मिळतोय ना केंद्र सरकारकडून. काल राज्याच्या अर्थसंकल्पातही पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींवर राज्य सरकारकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. अशातच मनसेनं आजच्या वर्धापन दिनी वडाळ्यातील नऊ पेट्रोल पंपावर प्रति लिटर 15 रुपयांची सूट देत सर्वसामान्यांना एक प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीविरोधात सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


वर्धापनदिनी मनसेकडून पेट्रोल-डिझेलवर 15 रुपयांची सूट, मुंबईच्या वडाळ्यात मनसेचा अनोखा उपक्रम