नागपूर : सत्ता प्रत्येकाला हवी असते. सत्तेसाठी संघर्ष करतानाही विवेक वापरायला हवा. निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा, युद्ध नको. सामाजिक अंतर निर्माण करणं हे राजकारण नाही. निवडणूक ही एक स्पर्धा आहे. ही स्पर्धा खेळीमेळीनं व्हावी, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सवात अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत संबोधन केले. यावेळी स्वयंसेवक डिजिटली या विजयादशमी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी मोहन भागवत म्हणाले की,  धर्मनिरपेक्षतेचं नाव घेऊन समाज तोडण्याची भाषा कुणी करु नये, असंही मोहन भागवत म्हणाले. कुठल्याही स्थिती सामाजिक भान समजून व्यक्त होणं गरजेचं असल्याचं देखील ते म्हणाले. संविधानाचं आणि अहिंसेचं पालन आपल्याला करायचं आहे. भडकाऊ बोलणाऱ्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. परस्पर विश्वासाचं वातावरण बनवून प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे, असं मोहन भागवत म्हणाले.


चीनला भारताने मोठा धक्का दिलाय
मोहन भागवत यांनी चीनचा समाचार घेत म्हटलं की, कोरोनाच्या महामारीमागे चीनचं नावं येत. चीननं आपल्या सीमेवर जो व्यवहार केलाय. त्यांचा स्वभाव विस्तारवादी आहे हे सर्वांना माहित आहे. त्यांनी अनेक देशांसोबत वाद केलाय. भारताने जो काही वार त्यांच्यावर केलाय त्यानं चीन मागे हटलाय. भारतीय सेनेनं चीनला धडा शिकवला. जगातल्या बाकी देशांनाही यामुळं बळ मिळालं. मात्र आता आपल्याला सावध राहावे लागेल. कारण ते काहीही करु शकतात. आपल्याला आता सर्व गोष्टीत चीनपेक्षा ताकतवर व्हावं लागेल. शेजारी राष्ट्रांसोबत संबंध आणखी दृढ करावे लागतील. आपण सर्वांशी मैत्री, कुणाशी भांडण्याचा स्वभाव आपला नाही. मात्र आपल्या स्वभावाला आपली दुर्बलता समजणं चूक आहे. चीनला आपण जो धडा शिकवला. आपल्या तयारी वाढवावी लागेल, असंही ते म्हणाले.


अनेक कृत्रिम गोष्टी कोरोनामुळं बंद झाल्या
संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. मात्र सावध राहणं गरजेचं आहे. नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक व्यवहार सुरु झाले आहेत. ते सुरु करावे लागतील. हे समाजाचं नवीन रुप आहे. या नव्या परिस्थितीनं आपल्याला अनेक अनुभव दिले आहेत. अनेक कृत्रिम गोष्टी कोरोनामुळं बंद झाल्या. याचं काही नुकसान नाही. कोरोनामुळं अनेकांचे रोजगार गेले आहेत. रोजगार सोडून गावी गेलेला मजूर आता परतत आहेत. परतलेल्यांना रोजगार आहेच असं नाही. त्यांना रोजगार शोधावा लागेल. कोरोनाला हरवण्याचा संकल्प करा, असं मोहन भागवत म्हणाले.


सांस्कृतिक मूल्यांचं आचरण करणं आपल्या लक्षात आलं
मोहन भागवत म्हणाले की, कोरोना काळात चांगलं काय आणि वाईट काय हे लोकांना कळालं. अनेक गोष्टी सुधारल्या आहेत. हवा शुद्ध झालीय, नदी नाल्यांचं पाणी चांगलं झालंय. अनेक पक्षी नवीन पाहायला मिळाले आहेत. अनावश्यक गोष्टी सोडल्यानं हा नवा आनंद आपल्याला मिळत आहे. सांस्कृतिक रितीरिवाज आणि स्वच्छतेचं महत्व आपल्याला कळलं आहे. आपल्या सांस्कृतिक मूल्यांचं आचरण करणं आपल्या लक्षात आलं आहे. पर्यावरणासोबत मित्र म्हणून राहणे आपल्या लक्षात आलं आहे. कोरोनाच्या या माराने काही सार्थक गोष्टींकडे आपल्याला वळवलं आहे . कोरोनामुळं जुन्या परंपरांना देखील महत्व आलं आहे, असं ते म्हणाले.