इतर मागास कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात ओबीसी , व्ही जे एन टी जनमोर्चाची संवाद परिषद पार पडली. या परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी एम पी एस सी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी ज्या संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करावा अशी मागणी करतायत त्या राजकीय दृष्टीने प्रेरित आहेत असा आरोप केला .
'महाविकास आघाडी सरकारने भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही जणांचा दबाव आहे त्यामुळे भरती होऊ शकली नाही . मात्र मी त्यासाठी कोणाचेही नाव घेणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा पाईक आहे. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढेही महाराष्ट्राची वाटचाल त्याच दिशेने व्हायला हवी', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटना वडेट्टीवार यांच्यावर ते समाजा-समाजांमधे भांडणं लावण्याच काम करत असल्याचा आरोप करत असताना महाराष्ट्राची सामाजिक विण उसवण्याच काम आम्ही करत नाहिये, तर आमच्यावर आरोप करणारे करतायत असा दावा वडेट्टीवार यांनी केला. जे आमच्यावर आरोप करतायत त्यांनी इतिहास वाचावा असंही वडेट्टीवार म्हणाले. या परिषदेत राज्यातील भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची आणि ज्यांची निवड झालीय त्यांचा नियुक्त्या लवकरात लवकर करण्याची मागणी करण्यात आली.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यातील भरती प्रक्रिया ही जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिलं . मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे . 25 जानेवारीला सर्वोच्च न्यायालय त्यावर निर्णय देणार आहे. त्यानंतर राज्यातील भरती प्रक्रिया सुरू केली जाईल आणि एमपीएससीची परीक्षा घेतली जाईल असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये याचा पुनरुच्चार केला. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात आहोत असं खोटं पसरवलं जात असल्याच वडेट्टीवार म्हणालेत.
छगन भुजबळांनी वाहतूक कोंडी सोडवत वाहनांना 'विना टोल' दिली वाट
''विजय वडेट्टीवार हूं मै''
परिषदेत भाषण करताना वडेट्टीवार म्हणाले की " काही म्हणतील की विजय वडेट्टीवार मंत्री असुन या परिषदेला कसे गेले... पण यारों का यार हू मै.... विजय वडेट्टीवार हूं मै.
काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी बैठक लाऊन घेतली. अर्धा डझन मंत्री त्याला उपस्थित होते. चारशेहुन अधिक विद्यार्थी जे परिक्षा पास झालेत त्यांचा विषय माझ्या डोक्यात घुसलाय. मी लाऊन धरलाय. माझ्या राजीनाम्याची मागणी करतायत. परंतु ओ बी सी च्या हक्कासाठी मला काही होत असेल तर हरकत नाही असही वडेट्टीवार म्हणाले.
तारीख पे तारीख नाही... मी तारीख सांगणार नाही.. पण मी केल्याशिवाय राहणार नाही.
मी राज्याचा मंत्री जरी असलो तरी तुमच्या पाठीमागे उभा राहणं हे माझं मानुसकीच्या नात्याने माझं कर्तव्य आहे असही सांगायला वडेट्टीवार विसरले नाहीत. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना धीर दिला. तुम्ही निराश होऊ नका डोळ्यांमध्ये अश्रू आणू नका मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी या मुलांना आश्वस्त केलं. राज्य सरकारने मराठा समाजातील तरुणांना ही डब्ल्यू एस च्या माध्यमातून लागू केलेलं आरक्षण हे तज्ञांची मतं लक्षात घेऊनच केलेला आहे असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांच्या या दाव्यांवर मराठा संघटनांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.