मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील भांडण आता विकोपाला गेल्याचं दिसतंय. चित्रा वाघ यांनी आपल्या सुनेला भडकावलं आणि आपल्यावर आरोप करायला लावले असं सांगत विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची एक ऑडिओ क्लिप ( Chitra Wagh Audio Clip ) ऐकवली. तसेच आपल्याला बदनाम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी चित्रा वाघ यांना ही कामगिरी दिली असल्याचं सांगत त्याचीही एक ऑडिओ क्लिप त्यांनी ऐकवली. 


विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, माझ्या घरामध्ये जे पाच वर्षे झाले होतं, त्यामध्ये माझ्या सुनेला चित्रा वाघ यांनी माझ्याविरोधात भडकावलं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही कामगिरी आपल्यावर सोपावली असल्याचं चित्रा वाघ म्हणतात. चित्र वारंवार म्हणत असतात आम्ही कुणाच्या मध्ये बोलत नाही. पण या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून स्पष्ट होतंय की चित्रा वाघ यांनीच आमच्या घरात भांडण लावण्याचं काम केलं.


विद्या चव्हाण यांनी जी ऑडिओ क्लिप ऐकवली, त्यामध्ये चित्रा वाघ या विद्या चव्हाण यांच्या सुनेशी बोलताना ऐकू येतंय.


काय आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये? 


माझं चंद्रकांतदादांशी बोलणं झालं. आपल्या दोघांचे या विषयावर बोलणं होईल असं वाटलं नव्हतं. मी एका आयपीएस अधिकाऱ्यालाही सांगितलं होतं. आपण तिच्यामागे एक पक्ष म्हणून नाही तर माणूसकी म्हणून उभी राहावं. तू काय बोलावं आणि बाकीच्यांचे मुद्दे कसे खोडून काढायचे सांगते. 


त्यासाठी तू एक अडीच मिनीटांचा व्हिडीओ शेअर कर. त्यामध्ये असं म्हण की, 


मी एका चांगल्या घरातून आलेली आहे. माझी लढाई ही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या विरोधात आहे. माझ्यावरती जे अतिशय खालच्या पातळीवरचे आरोप करण्यात आलेले आहेत त्याचे उत्तर मी देतेय. 
तो व्हिडीओ शेअर करताना सगळ्या न्यूज चॅनेलला टॅग करायचा. म्हणजे ते तुमच्याकडे येतील. 


तू व्हिडीओ बनव आणि आम्हाला पाठव. आज सेशन सुरू आहे त्यामुळे आजचा हा व्हिडीओ आला पाहिजे. या व्हिडीओमध्ये शेवटी म्हणायचं की, शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे महिलांसाठी काम केलं आहे. मी सुद्धा या राज्यातील महिला आहे. माझ्यावर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी अन्याय केला आहे.


त्यानंतर चित्रा वाघ यांनी तो फोन देवेंद्र फडणवीस यांच्याशी कनेक्ट करून दिला. त्यामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं. तो व्हिडीओ आपण पाठवूया, आपण मागे राहूयात आणि पूर्ण ताकद देऊयात. 


आपल्याला बदनाम करण्यासाठी हे केलं


ही ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर विद्या चव्हाण म्हणाल्या की, एखाद्याच्या घरामध्ये काही होत नसेल तर त्याला वेगळं वळण द्यायचं हे काम चित्रा वाघ यांनी केलं आहे. हे लोक कशा प्रकारे त्रास देऊ शकतात यावरून समोर येतय. माझ्या सुनेला वकिलांचं पॅनेल देणं, अडीच तीन लाखांची नोकरी , पार्ल्यात घर दिलं जातंय ते फक्त विद्या चव्हाणला बदनाम करण्यासाठी. खोट्या प्रकरणांमध्ये त्रास देण्यासाठी या गोष्टी केल्या जातात.