बारामती : राज्यात आपलेच सरकार येणार आहे. पवारांना सांगा आमचे सरकार येणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत म्हटलं आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी खुद्द शरद पवार यांनाही सुप्रिया सुळे यांच्या विजयाची खात्री वाटत नव्हती, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.
बारामतीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. राज्यात आपलेच सरकार येणार आहे. येणार आहे की नाही? असा प्रश्न यावेळी चंद्रकांत पाटलांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. त्यावर उपस्थितांनी होकार दिल्यावर, मग जरा हे पवारांना सांगा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
शरद पवारांना अजूनही आशा आहे की त्यांचेच सरकार येणार आहे. मात्र केंद्रात सत्ता स्थापनेनंतर राज्यातही आपलेच सरकार येणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान मी बारामतीला वेळ देणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने अशी लढत दिली होती की, मतमोजणीच्या दरम्यानही पवार साहेबांना सुप्रिया सुळे जिंकतील याची खात्री नव्हती. लोकसभा निवडणुकीत आपण थोडे मागे पडलो, असं म्हणत आपण यात नाउमेद न होता कुठे कमी पडलो याचा अभ्यास केला पाहिजे, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
शरद पवारांना सांगा आमचेच सरकार येणार आहे, चंद्रकांत पाटलांचं बारामतीत वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Sep 2019 10:21 PM (IST)
लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाने अशी लढत दिली होती की, मतमोजणीच्या दरम्यानही पवार साहेबांना सुप्रिया सुळे जिंकतील याची खात्री नव्हती, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -