रत्नागिरी : गणपतीसाठी कोकणाता गेलेल्या नागरिकांना परतीच्या मार्गावर मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सात दिवसांच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर मुंबईत परतण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीमुळे मडगावहून मुंबईला येणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात न थांबताच पुढे रवाना झाली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घातला.


खेड येथून अनेक प्रवाशांनी मुंबईला येण्यासाठी बुकिंग केलं होतं. मात्र ट्रेन आधीच प्रवाशांनी भरल्यामुळे खेड स्थानकावर ट्रेनमधील प्रवाशांनी डब्यांचे दरवाजे उघडलेच नाहीत. त्यामुळे खेड स्टेशनवरील प्रवाशांना ट्रेनमध्ये चढता आले नाही.



त्यावेळी संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरांच्या केबिनकडे धाव घेतली आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे पोलीस व खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र प्रवाशांनी बुकिंग करुन देखील मांडवी एक्सप्रेस न थांबल्याने मुंबईकडे जायचे कसे? असा प्रश्न उपस्थित केला.


काही वेळात हॉलिडे एक्स्प्रेस खेड स्थानकात दाखल होईल. त्यातून प्रवाशांना पाठवण्यात येईल, असं रेल्वेतर्फे जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे, मात्र हॉलिडे एक्स्प्रेसमध्येही गर्दी असल्याने खेड स्थानकातील प्रवाशांना त्यात जागा कशी मिळणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.