नागपूर : विधानपरिषदेसाठी भाजपकडून पृथ्वीराज देशमुख यांनी दाखल केलेला अतिरिक्त अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलैला होणारी निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे. भाजपाला निवडणूक बिनविरोध करायची असल्यानंच देशमुखांनी अर्ज माघारी घेतल्याचं मंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं.

महादेव जानकर यांनी रासपकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने भाजपने ऐनवेळी पृथ्वीराज देशमुख यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बारा अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पृथ्वीराज देशमुखांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम लागला आहे.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलैला मतदान होणार आहे, तर याच दिवशी सायंकाळी पाचनंतर मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे एक, शिवसेनेचे दोन, रासप एक, शेकाप एक आणि भाजपचे चार उमेदवार रिंगणात आहेत.

पक्षनिहाय उमेदवार 


भाजप - भाई गिरकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, नीलय नाईक (वसंतराव नाईक यांचा नातू), राम पाटील रातोळीकर
रासप - महादेव जानकर,
शिवसेना - अनिल परब, मनिषा कायंदे
काँग्रेस - शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा
राष्ट्रवादी काँग्रेस - बाबाजानी दुर्राणी
शेकाप- जयंत पाटील


या सदस्यांचा कार्यकाळ संपणार
भाजपचे भाई गिरकर, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे.


विधानपरिषद बलाबल -
राष्ट्रवादी काँग्रेस : 22
काँग्रेस : 19
भाजप : 17
शिवसेना : 9
जदयू : 1
शेकाप : 1
रिपाइं : 1
अपक्ष : 7
रिक्त : 1
एकूण : 78



संबंधित बातम्या :


घोडेबाजार टाळणार, विधानपरिषदेच्या सर्व 11 जागा बिनविरोध होणार?


काँग्रेसतर्फे रणपिसे, वजाहत मिर्झांना विधानपरिषदेचं तिकीट


विधानपरिषदेची संधी डावलल्याने दीपक सावंत शिवसेनेवर नाराज?