पंढरपूर : माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरने घरी परतत असताना कालव्यात पडून अपघात झाला आहे. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी आहेत. काल रात्री निमगाव येथे घडली दुर्घटना घडली.


वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर कालव्यात कोसळला. भरलेल्या शेंगा आणि ट्रॅक्टर अंगावर पडल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर हा अपघात ट्रॅक्टरचे स्टेअरिंग लॉक झाल्याने घडल्याचे बोलले जात आहे. शेत मालकीण छाया गोफणे काल दिवसभर मजुरांच्या मदतीने शेतातील शेंगा काढायचे काम करून घरी परतत असताना हा अपघात झाला.

अपघातात छाया गोफणे त्यांची आई शांताबाई कोयले आणि केराबाई कोयले यांचा समावेश आहे. तर इतर चार जण जखमी झाले. ही दुर्घटना रात्रीच्या अंधारात घडल्याने अपघातग्रस्तांना लवकर मदत मिळू शकली नाही. मात्र कुर्डुवाडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थाळी धाव घेत तातडीने मदत कार्यास सुरुवात केली. दुर्घटनेतील चारही जखमींना उपचारासाठी सोलापुरात हलविण्यात आले आहे .

मृत झालेल्या शेतमालक छाया गोफणे या मुंबई येथील रहिवासी आहेत. शेतातील शेंगा काढण्यासाठी ते आपल्या गावी आल्या होत्या. या अपघातातील सर्व मृत आणि जखमी शिरशिंगे गावातील आहेत.