मुंबई : विधानपरिषेदेच्या दोन जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांसाठी आज महाविकास आघाडी आणि भाजपाच्या वतीने उमेदवारांनी अर्ज दाखल केले. धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत यांची विधानसभेच्या सदस्यपदी निवड झाल्याने दोन जागा रिक्त झाल्या होत्या. धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय दौंड आणि भाजपाकडून राजन तेली यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर तानाजी सावंत यांच्या रिक्त झालेल्या जागी शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी अर्ज दाखल करणार आहेत, तर भाजपकडून सुमीत बजोरिया यांनी अर्ज दाखल केला आहे.


भाजपाकडून राजन तेली रिंगणात आहेत. राष्ट्रवादीकडून मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय दौंड यांनी आज अर्ज भरला आहे. भाजपकडून विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, विनोद तावडे, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत राजन तेली यांनी अर्ज भरला.


संजय दौंड


संजय दौंड हे काँग्रेसकडून परळी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होते. मात्र या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांना सहकार्य करून त्यांच्या ठिकाणी रिक्त होणाऱ्या जागेवर संजय दौंड यांना विधानपरिषदेवर घेतले जाईल, असा शब्द शरद पवारांनी दौंड यांना दिला होता. संजय दौंड यांचे वडील पंडितराव दौंड हे 1985 ते 90 रेणापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर पंडितराव दौंड यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहिलं. संजय दौंड हे 1992 ते 2002 आणि त्यानंतर दीड वर्ष असे एकूण साडेअकरा वर्ष बीड जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यानंतर युवक काँग्रेसच्या राज्य कमिटीवर देखील संजय दौंड यांनी काम केलं. 2011 ते 2016 या दरम्यान संजय धोंडे परळी मार्केट कमिटीचे सदस्य होते. संजय दौंड यांची पंकजा मुंडे यांचे विरोधक म्हणून परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये ओळख आहे.


राजन तेली


राजन तेली यांनी कॉलेजमध्ये असतानाचा आपली राजकीय कारकिर्दि सुरु केली होती. 1986 मध्ये ते सर्वप्रमथ शिवसेना उपशापप्रमुख झाले. त्यानंतर 1990 मध्ये शिवसेना तालुका प्रमुख, 1995 मध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख, 1997 जिल्हा परिषद अधिकार, 1999 मध्ये कोकन सिंचन उपाध्यक्ष, 2006-12 ते विधान परिषद आमदार होते. 2013 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष, सध्या ते भाजपा प्रदेश चिटणीस आहेत. राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेचे माजी राज्य मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. शिवसेनेसोबत युती असल्याने तेली यांनी आधी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता.


सुमीत बजोरिया


सुमीत बजोरिया राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे धाकटे बंधू आहेत. सुमीद बजोरिया विदर्भातील मोठे कंत्राटदार आहेत. सिम्बॉयसिस येथून त्यांनी बी. कॉम, एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. यवतमाळ नगरपरिषदचे ते माजी सदस्य आहेत, जिल्हा कंत्राटदार संघाचे माजी अध्यक्ष होते, जिल्हातील सर्व पक्षाच्या नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा जवळीक असलेले बाजोरिया यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे.


दुष्यंत चतुर्वेदी


नागपूर येथे जन्मलेले दुष्यंत चतुर्वेदी लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे ते संचालक आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे सिनेट सदस्यही आहेत. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे ते पुत्र असून काही दिवसापूर्वी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.