अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सर्वांचीच मनं जिंकली आहेत. कायमच समाजभान जपत आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या या नेत्यानं त्याचं वेगळेपण जपलं आहे. या संकटच्या वेळी जेव्हा आपापसांतील अंतर सुरक्षेच्या कारणास्तव वाढत असतानाच नकळत, अनेकदा माणुसकीच्या नात्यातही दुरावा आल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, रोहित पवार यांनी यालाही शह दिला आहे.
रोहित पवार यांनी नुकतीच एका कोविड सेंटरला भेट दिली आणि तिथे जाऊन रुग्णांची आपलेपणानं चौकशी केली. इतकंच नव्हे, तर तिथे असणाऱ्या अबालवृद्धांसोबत त्यांनी चक्क मराठी चित्रपटगीतावर ठेकाही धरला. कर्जत येथील कोव्हिड सेंटरला रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तिथं असणाऱ्या रुग्णांसोबतच 'झिंगाट' गाण्यावर नृत्य करण्याचाही आनंद घेतला. रोहित पवारांच्या या डान्सची आणि त्यांच्या या अंदाजाची कर्जत तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या क्षणांचा एक व्हिडीओही सर्वांच्या भेटीला आणला आहे. 'गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या 'झिंगाट' गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो', असं त्यांनी ट्विट करत लिहिलं.
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर वाटप-रोहित पवार
काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला होता. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेत कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि निर्माण होणारा ऑक्सीजनचा तुटवडा लक्षात घेऊन रोहित पवार यांनी बारामती ऍग्रोच्या माध्यमातून 39 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपकरणं जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यामुळे कोरोना संकटमय परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यास बारामती ऍग्रोचा आधार मिळाला आहे. कोरोनाबाधित रुग्णासाठी सुरुवातीच्या काळात ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' हे उपकरण प्रभावी ठरते. या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते.