यवतमाळ : स्वतंत्र विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते जांबुवंतराव धोटे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. मध्यरात्री तीन वाजता यवतमाळ शासकीय महाविद्यालयात धोटे यांची प्राणज्योत मालवली. जांबुवंतराव धोटे 83 वर्षांचे होते.

जांबुवंतराव धोटे काँग्रेसतर्फे महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाचवेळा, तर लोकसभेवर दोनवेळा निवडून आले होते. धोटे यांनी विधानसभा आणि लोकसभेत विदर्भाचा आवाज बुलंद केला. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच इतर प्रश्नही धोटेंनी आक्रमकपणे मांडले.

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी उचलून धरणाऱ्या जांबुवंतरावांना 'विदर्भवीर' असंही संबोधलं जातं. काँग्रेस सोडल्यानंतर 2002 मध्ये त्यांनी 'विदर्भ जनता काँग्रेस' पक्षाची स्थापना केली होती. जांबुवंतराव धोटेंच्या निधनाने विदर्भावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात क्रांती धोटे-राऊत आणि ज्वाला धोटे-भोयर या कन्या, तर पत्नी माजी आमदार विजया धोटे असा परिवार आहे

जांबुवंतराव धोटे यांचा अल्पपरिचय

शारीरिक शिक्षण या विषयाचे शिक्षक म्हणून महापालिकेच्या शाळेत 1958 मध्ये रुजू

1959 मध्ये जवाहरलाल दर्डांचा पराभव करुन नगरसेवकपदी

1962 मध्ये यवतमाळ विधानसभेत विजयी (पक्ष फॉरवर्ड ब्लॉक )

1964 मध्ये आमदार असताना त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांना सभागृहात पेपर वेट फेकून मारला होता. दुष्काळी परिस्थितीवर बोलू न दिल्याने त्यांनी हे कृत्य केलं. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती. देशातील ही पहिलीच कारवाई होती. डिसेंबर 1964 मध्ये आमदारकी रद्द केल्याने पोटनिवडणूक झाली. त्यात काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून ते पुन्हा विजयी झाले.

1967 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत आमदारपदी

1967 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव

1971 मध्ये नागपूर लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींची लाट असूनही फॉरवर्ड ब्लॉककडून विजयी

1978 मध्ये यवतमाळ विधानसभेत आमदार

विधानसभेत काँग्रेससोबत युती, इंदिरा गांधींना महाराष्ट्रभर फिरून मदत केली. त्यावेळी फॉरवर्ड ब्लॉक काँग्रेस आघाडीत धोटे यांचे 19 आमदार निवडून आले होते

1980 मध्ये नागपूर लोकसभा निवडणुकीत कॉग्रेसच्या तिकीटावर नागपूरहून खासदार म्हणून विजयी

जांबुवंतराव धोटे यांनी आजवर केलेली प्रमुख आंदोलनं

*वेगळ्या विदर्भाचे आंदोलन
*विणकर आंदोलन
*इंग्रजी भाषेच्या विरोधात आंदोलन
*अकोला येथे कृषी विद्यापीठ व्हावं म्हणून 1968 मध्ये मोठे आंदोलन उभे केले. त्यात 5 जण शहीद झाले. संपूर्ण विदर्भात हे आंदोलन झाले होते

1978 ला त्यांनी "जागो" चित्रपटात मुख्य भूमिका त्यांना केली होती