Vidarbha Unseasonal Rain : गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. राज्यात एकीकडे उष्णतेचा (Heat) पारा तापत असताना विदर्भात मात्र सलग पावसाची हजेरी लागताना दिसत आहे. अशातच आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह  30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.


तर आज नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर हा यलो अलर्ट पुढे 22 मे पर्यंत कायम राहणार आहे. संभाव्य इशारा लक्षात घेता शेतकर्‍यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आल्या आहेत.


हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी


हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पासून पुढील पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आज नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह 40-50 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या, 19 मे ते 22 मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केलाय. 


शेतात जमीनदोस्त झालेल्या भात पिकांना अंकुर 


गेल्या दोन आठवड्यापासून भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कापणीला आलेले भातपीक जमीनदोस्त झाले आहे. तर काही ठिकाणी कापून ठेवलेला भातपीक पावसात सापडल्यानं ओले झाले आहे. या घटनेला आता आठवडा लोटला असला तरी, आजही अनेकांच्या शेतात अवकाळीचे पाणी साचून आहे. परिणामी अनेकांची मळणी रखडली आहे. या अवकाळी पावसानं शेतकरी पुरता हतबल झाला असून आर्थिक विवंचनेत अडकला आहे. आता तर, आठवड्यापासून भातपीक पाण्यात असल्यानं शेतातच जमीनदोस्त झालेल्या भात पिकांना अंकुर फुटल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 


लिंबूचे दीडशे झाडं उन्मळून पडली


वाशिमच्या मालेगाव तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली. यात वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथील शेतकरी अनिल बुद्धिवंत यांच्या शेतातील लिंबूचे दीडशे झाडं उन्मळून पडली असून त्यात त्यांची संपूर्ण बाग उध्वस्त झालीये. यावर्षी त्यांची बाग चागलीच बहरली होती. तसेच लिंबु पिकाला चांगले दर देखील मिळत होते. कडक उन्हामुळे लिंबूची मागणी वाढल्याने  याच बागेतून दीड लाखाचे उत्पन्न मिळाले होते. तर येत्या महिन्याभरात हजारो रुपये उत्पन्न होण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र त्याआधीच नैसर्गिक संकटाने अचानक बाग उध्वस झाल्याने अनिल बुद्धिवंत हवालदिल झालेत. या नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीये.


मिरची उत्पादकांना अवकळी पावसाचा फटका 


भंडारा जिल्ह्यात धान पीक हे मुख्य उत्पादन असलं तरी आता नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी बागायती शेतीच्या माध्यमातून मिरचीचं उत्पादन घेऊ लागले आहेत. मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. या अवकाळी पावसामुळं भात पीक जमीनदोस्त झालंच तर, पालेभाज्यांच्या शेतीलाही मोठा फटका बसलाय. सोबतच मिरची पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचं चित्र भंडारा जिल्ह्यात बघायला मिळतंय.


इतर महत्वाच्या बातम्या