नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना (Maharashtra Lok Sabha Election 2024 Notification) आजपासून लागू करण्यात आली आहे. आजपासून उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. आज नागपूरसह पूर्व विदर्भातील रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघांसाठी ही अधिसूचना लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचे बघायला मिळत आहे. नागपूर शहरालगतच्या सर्व सीमेवर पोलिसांनी नाकाबंदी करत चोख पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सोबतच निवडणूक आयोगाचे भरारी पथक देखील वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

शहराच्या सीमेवर नाकाबंदी, सर्व यंत्रणा सुसज्ज

निवडणूक काळामध्ये  मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने अमली पदार्थ, स्फोटक, पैशांची तसेच इतर वस्तूंची तस्करी अथवा पुरवठा करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने आज सकाळपासूनच शहरातील अनेक भागात नाकाबंदी करण्यात आली असून संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार पोलीस यंत्रणेसह इतर संबंधित सर्व यंत्रणा सुसज्ज झाली आहे. आज शहरातील अनेक भागात नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

प्रचार साहित्याच्या दुकानात अद्याप गर्दी नाही

सध्या राज्यात भाजप वगळता अन्य पक्षांनी आपली उमेदवारी जाहीर केली नसल्याने प्रचार साहित्याच्या दुकानात म्हणावी तशी गर्दी किंवा लगबग पाहायला मिळत नाहीय. मात्र नागपुरात नितीन गडकरी, रामदास तडस यांच्यासह प्रतिभा धानोरकर आणि संजय देशमुख यांनी डमी प्रिंट छापून घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूरमधून उमेदवारीचा दावा केला आहे. त्यामुळे डमी प्रिंट पक्षाच्या आदेशाने तर छापून घेतलेल्या नाहीत ना, असा प्रश्न विचारला जात आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

आजपासूनच नामनिर्देशन पत्र स्वीकारले जात आहेत. 27 मार्चपर्यंत उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर 30 मार्च उमेदवारी अर्ज परत घेण्याची अखेरची मुदत असणार आहे. विशेष म्हणजे 20 मार्च ते 27 मार्च उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीमध्ये तीन दिवस प्रशासनिक सुट्टी आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना पाचच दिवस मिळणार आहेत. 

विदर्भातील  कोणत्या मतदारसंघात कधी निवडणूक

मतदारसंघ नाव मतदान तारीख निवडणूक निकाल 
नागपूर 19 एप्रिल 2024 4 जून 2024
बुलडाणा  26 एप्रिल 2024 4 जून 2024
अकोला   26 एप्रिल 2024 4 जून 2024
अमरावती 26 एप्रिल 2024 4 जून 2024
वर्धा 26 एप्रिल 2024 4 जून 2024
रामटेक  19 एप्रिल 2024 4 जून 2024
भंडारा-गोंदिया 19 एप्रिल 2024 4 जून 2024
गडचिरोली-चिमूर 19 एप्रिल 2024 4 जून 2024
यवतमाळ - वाशिम 26 एप्रिल 2024 4 जून 2024
चंद्रपूर   19 एप्रिल 2024 4 जून 2024

संबंधित बातम्या