भंडाऱ्यात असताना अस्वस्थ वाटू लागल्याने भैय्यालाल भोतमांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला. त्यांना तातडीने नागपूरला हलवण्यात आलं. मात्र नागपुरात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भोतमांगे यांच्या मृत्यूनंतर दलित चळवळीतील आणि रिपब्लिकन पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली. उद्या सकाळी त्यांच्यावर भंडाऱ्यात अंत्यसंस्कार केले जातील.
दरम्यान, खैरलांजी हत्या प्रकरण अजूनही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे भैयालाल भोतमांगे यांच्या हयातीत या प्रकरणाचा अंतिम निकाल लागू शकला नाही, याची खंत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
काय आहे खैरलांजी हत्याकांड प्रकरण?
संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाला आज 10 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत. भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद विधानसभेसह संसदेतही उमटले होते.
दलित आणि सवर्णांच्या वादात दलित कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. भैयालाल भोतमांगे यांची पत्नी आणि तीन मुले अशा चौघांची हत्या झाली होती. शेतावर गेले असल्याने कुटुंबप्रमुख भैयालाल भोतमांगे एकटेच वाचले होते.
आरोपींना फाशी व्हावी यासाठी अनेक आंदोलनं झाली. भोतमांगेना न्याय मिळावा म्हणूण अनेक दलित संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. भैयालाल भोतमांगे यांची अजूनही न्यायासाठी लढाई सुरु होती.
या हत्याकांडानंतर तब्बल एक महिन्यानंतर खटला सुरु झाला होता. 15 ऑक्टोबर 2008 साली भंडारा सत्र न्यायालयाने 8 जणांना दोषी ठरवलं. त्यानंतर 2010 साली नागपूर खंडपीठाने 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
सध्या सर्वोच्च न्यायालयात हा खटला सुरु असून आरोपींना फाशी व्हावी, अशी भैयालाल भोतमांगे यांची मागणी होती. न्यायासाठी त्यांनी तब्बल 10 वर्षे लढाई दिली. मात्र दुर्दैवाने या प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच त्यांचं निधन झालं.