नवी मुंबई : राज्यात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम आता भाज्यांच्या उत्पादनावरही होऊ लागला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे भाज्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भाज्यांचे दर वाढण्याची चिन्हं आहेत.


पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यात भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं जातं. मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच वाढलेल्या उष्णतेचा परिणाम भाज्यांच्या उत्पादनावर दिसून येत आहे.

राज्यातील भाज्यांचं उत्पादन निम्म्यावर आल्याचं चित्र आहे. म्हणजेच जवळपास 50 टक्क्यांनी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
पालेभाज्या, टॉमेटो, काकडी, फ्लॉवर, तोंडली, शेंगा यासारख्या भाज्यांच्या उत्पादनात मुख्यत्वे घट झाली आहे.

याशिवाय राज्याच्या अनेक भागात पाण्याचंही दुर्भिक्ष जाणवत आहे. परिणामी भाजीपाल्याखालील क्षेत्र कमी झालं आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात भाज्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला खिसा जरा जास्त रिकामा करावा लागेल.