मुंबई : विरोधीपक्षांनी राष्ट्रगीतावर बहिष्कार टाकला, आजपर्यंत कितीही अटीतटीचे प्रसंग आले, पण विरोधीपक्षाच्या सदस्यांनी राष्ट्रगीतावर बहिष्कार टाकलेला नाही, यापुढे ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. विरोधकांच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होती. पण त्यांनी चर्चेतून पळ काढला. निवडणुकीतील पराभवाने खचून गेलेल्या विरोधी पक्षांनी चर्चेतून पळवाट शोधली, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
पत्रकार हल्लाविरोधी कायद्याला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पत्रकार हल्लाविरोधी कायद्याचा दुरुपयोग केला जाऊ नये, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
विरोधक कर्जमाफीवर आक्रमक
शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मॉडेलचा अभ्यास करण्याची गरज नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली.
सभागृहात सरकारने मुस्कटदाबी केली आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरुन संघर्षयात्रेच्या माध्यमातून कर्जमाफीची मागणी केली. कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली.
मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेतील भाषणात विरोधकांवर तोफ
समृद्धी हायवे किंवा बुलेट ट्रेनवर टीका करणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले. “आपल्याला रस्त्याने यावं लागत नाही, आपल्यासाठी विमानाची सोय आहे. हा लोकांसाठीचा रस्ता आहे.”, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते.
“समृद्धी हायवेसाठी आम्ही 40 हजार कोटी आणि बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी सरकार खर्च का करता, असं तरुण आणि उमदे नेते विचारत आहेत. लोकांना वाटतं काय नालायक सरकार आहे. इतके पैसे खर्च करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी पैसे नाही. पण नारायण राणेंना विचारा, त्यांचा अर्थकारणावर अभ्यास चांगला आहे. आपल्याला रस्त्याने नाही यावं लागत, आपल्याला विमानाची सोय आहे. हा लोकांसाठीचा रस्ता आहे.” असं उत्तर विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी दिले.
“सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांना पराभूत व्हावं लागलं. त्यानंतरच कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला. EVM मध्ये घोटाळा झाला असं आम्हालाही वाटलं होतं, तुम्हाला ही वाटणार. सत्य पचवायला आणि हार स्वीकारायला वेळ लागतो. होईल सवय.”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. त्याचवेळी, कर्जमाफी लढा तुम्ही तीव्र केला, पण जिल्हा परिषद निवडणुकीत पडल्यावरच का मोठा केला?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला.